पावसाळ्यात ७० गावांचा संपर्क तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:13 AM2021-05-22T04:13:17+5:302021-05-22T04:13:17+5:30

नरेंद्र जावरे परतवाडा : देशभर लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व कामे बंद आहेत. अशातच परतवाडा चिखलदरा मार्गावरील धोतरखेडानजीकच्या सापन नदीवरील ...

70 villages will be cut off during monsoon | पावसाळ्यात ७० गावांचा संपर्क तुटणार

पावसाळ्यात ७० गावांचा संपर्क तुटणार

Next

नरेंद्र जावरे

परतवाडा : देशभर लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व कामे बंद आहेत. अशातच परतवाडा चिखलदरा मार्गावरील धोतरखेडानजीकच्या सापन नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम वर्षभरापासून अर्धवट थांबले आहे. प्रशासनाने जुना दोनशे मीटर लांब पूल तोडल्याने पावसाळ्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण करून सुरू न झाल्यास चिखलदरासह परिसरातील जवळपास ७० गावांचा संपर्क तुटणार आहे.

काम करणाऱ्या कंपनीने पळ काढल्यानंतर काम बंद आह. तर नागरिकांचा नदीपात्रातून प्रवास सुरू आहे. परतवाडा चिखलदरा मार्गावर धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ किलोमीटरचा आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आहे.

सापन नदीवरील जुना दोनशे मीटर पूल तोडून नवीन पुलाच्या कार्याला धोतरखेडानजीक सुरुवात जोमाने झाली होती. गतवर्षी मात्र, २३ मार्च रोजी देशात लॉकडाऊनचा आदेश झाल्याने ही सर्व कामे बंद होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने नियमानुसार कामाला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेच्यावतीने करण्यात आला आणि कार्यकर्त्यांनी कंट्रक्शन कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चोपून काढले. यासंदर्भात पोलिसात तक्रार झाली, तर दुसरीकडे सदर कंपनीने काम अर्धवट सोडून पळ काढला. परिणामी मागील आठ महिन्यांपासून पुलासह रस्त्याचे काम बंद आहे.

बॉक्स

वर्षभरापासून नदीपात्रातून प्रवास

सापन नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा जलप्रवाह असतो. दुसरा मार्ग सावळी गावातून आहे. हा रस्ता पूर्णत: खराब झाल्याने तेथून प्रवास करणे कठीण झाले आहे. वर्षभरापासून नागरिकांचा नदीपात्रातून प्रवास सुरू असताना पुलाचे राहिलेले अर्धवट काम पूर्ण न झाल्यास ७० गावांचा संपर्क तुटणार आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने संबंधित कंस्ट्रक्शन कंपनीला गंभीर इशारा देणारे पत्रव्यवहार करण्यात आले आहे. त्यानंतर सुद्धा कंपनीने नेहमीप्रमाणेच सब कॉन्ट्रॅक्टर निवडीची प्रक्रिया सुरू केली. आठ दिवस काम सुरू राहिले. पुन्हा आर्थिक व्यवहारामुळे बंद पडल्याची माहिती आहे.

कोट

सापन नदीवरील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्र दिले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलावरून वाहतूक सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहे.

- चंद्रकांत मेहत्रे,

कार्यकारी अभियंता,

सांबा विभाग, अचलपूर

Web Title: 70 villages will be cut off during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.