धारणी शहरात ७० वर्षे जुनी इमारत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:58+5:302021-04-16T04:12:58+5:30
मोठी जीवितहानी टळली धारणी : शहरातील मुख्य महामार्गावर चर्चसमोर असलेली ७० वर्षे जुनी इमारत अचानक कोसळली. या घटनेत घरातील ...
मोठी जीवितहानी टळली
धारणी : शहरातील मुख्य महामार्गावर चर्चसमोर असलेली ७० वर्षे जुनी इमारत अचानक कोसळली. या घटनेत घरातील आठ जणांचा जीव थोडक्यात वाचला.
शहरातील धारणी ते अमरावती या मुख्य महामार्गावर चर्चसमोर फारूक अब्दुल रजाक (५०), जावेद अब्दुल (४५) या दोघांच्या मालकीची ही ७० वर्षे जुनी वडिलोपार्जित इमारत होती. त्यामध्ये दोन महिला आणि चार मुले असे दोन्ही भावांचे एकत्रित कुटुंब राहत होते. गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास इमारतीच्या एका भिंतीला तडा गेल्याचा आवाज घरात नुकत्याच आलेल्या जावेद अब्दुल रजाक यांना आला. त्यांनी तात्काळ घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले. यावेळी दोन मजली घराच्या विटा विलग होऊन जमिनीवर कोसळत असल्याचे त्यांनी बघितले. तितक्यातच अचानक घराचा अर्धा भाग कोसलून चर्च समोरूम जाणाऱ्या धारणी-बासपाणी या बायपास मार्गावर कोसळला. त्या रस्त्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात रहदारी असते. काही वेळ रस्ता बंद झाला होता. इमारत कोसळत असताना तेथे कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. या घटनेची माहिती धारणी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाला मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते व पोलीस कर्मचारी तसेच नगरपंचायत कर्मचारी अमीन शेख, उमेश मालवीय, राहुल खाडे, करीम हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानी जेसीबीच्या साहाय्याने अर्धवट राहिलेली इमारत पाडली आणि बायपास रस्ता रहदारीस मोकळा करून दिला.
------------घरातील साहित्याचे प्रचंड नुकसान
दोन्ही भाऊ एकत्रित राहत असल्याने दोन्ही कुटुंबांकडील जीवनावश्यक साहित्य मातीमोल झाले. यात गॅस शेगडी-सिलिंडर, लाकडी दिवाण, कोठ्या, स्टील भांडी, गोदरेज अलमारी, फ्रीज, वाॅशिंग मशीन, कूलर, फॅन, अन्नधान्य आदी साहित्याचा समावेश आहे.
समयसूचकता आली कामाला
घरमालक जावेद अब्दुल रजाक यांना अचानक इमारतीच्या भिंतीला क्रॅक गेल्याचा आवाज आल्याने त्यांनी समयसूचकता दाखवत घरातील सर्व सदस्यांना तात्काळ बाहेर काढले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत इमारत कोसळली. त्यांच्या समयसूचकतेणे घरातील सदस्यांचा जीव थोडक्यात वाचला.
बाईट
मला भिंतीला क्रॅक गेल्याचा आवाज येताच मी सर्वांना घराबाहेर काढण्यात यश आले आमचे नशीब बलवत्तर आहे हीच घटना रात्रीच्या झोपेत घडली असती तर कदाचित आम्ही उद्याचा दिवस पाहू शकलो नसतो
जावेद अब्दुल रजाक
घरमालक धारणी