७० वर्षांपासून त्यांची अविरत भूतदया
By admin | Published: August 21, 2016 12:11 AM2016-08-21T00:11:26+5:302016-08-21T00:11:26+5:30
नजीकच्या राजुरा काळे येथील सधन कास्तकार एम.के.काळे मागील ७० वर्षांपासून चिमण्यांना दाणा-पाणी देण्याचा उपक्रम अविरत राबवीत आहेत.
सेवाभाव : आदर्श घेण्याची गरज
चांदूररेल्वे : नजीकच्या राजुरा काळे येथील सधन कास्तकार एम.के.काळे मागील ७० वर्षांपासून चिमण्यांना दाणा-पाणी देण्याचा उपक्रम अविरत राबवीत आहेत. त्यांच्या मातोश्री लंकाबाई कवडुजी काळे यांच्या धार्मिकतेतून त्यांना हे भूतदयेचे धडे मिळाले आहेत.
पक्ष्यांना बाजरी, तांदूळ, गव्हाची चुरी त्यांच्या अंगणात पडलेले असते. दिवसातून तीन ते चार वेळा खाद्य टाकले जाते. पक्ष्यांनाही एव्हाना काळे यांच्या या कृतीची सवय झाली आहे. तेदेखील त्यांच्या अंगणात तळ ठोकून असतात. मागील ७० वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम न चुकता सुरू आहे. सधन कास्तकार असलेल्या काळे यांना पशू-पक्ष्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. त्यांना जगविण्याची त्यांची तळमळ त्यांच्या कृतीतून दिसून येते. त्यांच्या मातोश्रींचे सन १९९५ साली निधन झाले. पशू-पक्ष्यांसह मूक प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण त्यांनी दिली होती. त्यामुळेच त्यांच्यावर भूतदयेचे संस्कार रूजले आणि त्यांनी हा वारसा पुढे चालविला आहे. सन १९३७ पासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. पक्षी न चुकता काळे यांच्या अंगणात न चुकता हे पक्षी येतात कारण येथे त्यांना खाद्यान्न मिळते. एकीकडे चिमण्या वाचविण्यासाठी मोठे उपक्रम राबविले जातात. विविध घोषणाबाजी केली जाते. या पार्श्वभूमिवर अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविणारे काळे यांचा खरोखरीच आदर्श घ्यायला हवा. (तालुका प्रतिनिधी)