धक्कादायक...विदर्भात आठ महिन्यांत ७०० शेतकऱ्यांचे बळी

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 8, 2024 07:02 PM2024-09-08T19:02:27+5:302024-09-08T19:02:43+5:30

दर आठ तासात एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला

700 farmers died in eight months in vidarbha | धक्कादायक...विदर्भात आठ महिन्यांत ७०० शेतकऱ्यांचे बळी

धक्कादायक...विदर्भात आठ महिन्यांत ७०० शेतकऱ्यांचे बळी

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहेत. विदर्भात यंदा आठ महिन्यांत ६९८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला आहे. दर आठ तासात एक शेतकरी अस्मानी अन् सुलतानी संकटाचा बळी ठरत असल्याचे दाहक वास्तव आहे.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, बँकांचे व सावकारांचे कर्ज, कर्जासाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकरी सावरला; पण पश्चिम विदर्भातील शेतकरी संघर्षावर मात करीत आहेत. यासाठी शासन-प्रशासनाचे प्रयत्न थिटे असल्याने दरदिवशी तीन शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटाचे बळी ठरत आहेत.

शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवली जात आहे. त्यानुसार अमरावती विभागात आतापर्यंत २० हजार ७७२ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी १० हजार ७६३ प्रकरणे विविध कारणांनी अपात्र, तर ९ हजार ७३५ प्रकरणे पात्र ठरली आहेत. ९ हजार ५३७ प्रकरणांत शासन मदत देण्यात आलेली आहे. अद्याप २७४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शासन, प्रशासन शेतकरी आत्महत्यांविषयी गंभीर नसल्याने कोणत्याही ठोस उपाययोजना यामध्ये झाल्या नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

दरदिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या
१) यंदा आठ महिन्यांत ६९८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २०४, अमरावती १८०, बुलढाणा १५५, अकोला १०६ व वाशिम जिल्ह्यात ५३ प्रकरणे आहेत.
२) यापैकी २१८ प्रकरणे पात्र, २१५ अपात्र, २६५ चौकशीसाठी प्रलंबित आहेत. फक्त ६५ प्रकरणांत शासन मदत देण्यात आलेली आहे. विभागात दर तीन तासात एक शेतकरी आत्महत्या होत आहे.

Web Title: 700 farmers died in eight months in vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.