७०० आदिवासींना आज काढणार जंगलाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:24 PM2018-01-07T23:24:05+5:302018-01-07T23:24:45+5:30
मेळघाटातील आदिवासींचे नेता राजकुमार पटेल यांना विश्वासात घेऊन जंगलात शिरलेल्या हजारेक आदिवासींना जंगलाबाहेर आणा,....
आॅनलाईन लोकमत
अमरावती : मेळघाटातील आदिवासींचे नेता राजकुमार पटेल यांना विश्वासात घेऊन जंगलात शिरलेल्या हजारेक आदिवासींना जंगलाबाहेर आणा, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत.
व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील सोमठाणा खुर्द, सोमठाणा बुजरूक, धारगड, अमोना, केलपानी, गुल्लरघाट, नागरतास, बारूखेडा या आठ गावांत वास्तव्यास असलेल्या आदिवासी महिला-पुरुषांना जंगलातून काढून तेल्हारा आणि अकोट तालुक्यांतील पुनर्वसनस्थळी आणावे, अशी योजना जिल्हा प्रशासनाची होती. तसे केलेही गेले. सुमारे ७०० आदिवासींना पुनर्वसित केले गेले; तथापि शासनाने तीन वर्षांत शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, रस्ते, मुबलक पाणी, रोजगार, आरोग्य यापैकी एकही सुविधा न दिल्याने आदिवासी अस्वस्थ झाले. आजार वाढू-जडू लागले. तरणीताठी मुले पटापट मरून पडली. पुनर्वसित गाव सोडण्याचा निर्णय अदिवासींनी घेतला. ते पुन्हा त्यांच्या मूळ अधिवासस्थळी पोहोचले. बंडाचे निशाण फडकविलेल्या आदिवासींना समजविताना प्रशासनाची त्यावेळी चांगलीच दमछाक झाली होती. आदिवासी नेता राजकुमार पटेल यांनी त्यावेळी प्रशासनाची विनंती मान्य करून आदिवासींना शांत केले होते. सुविधा निर्मितीच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही स्थिती तीच असल्याने तिनेक महिन्यांपूर्वी आदिवासी पुन्हा जंगलात शिरले. त्यांची मूळ निवासस्थाने नष्ट करण्यात आल्यामुळे आता ते उघड्यावर राहत आहेत. रात्रीचे तपमान दोन अंशांपर्यंत उतरू लागले आहे. त्या परिसरात वाघाचेही दर्शन झाले आहे. आदिवासी बांधवांच्या जीविताला त्यामुळे गंभीर धोका उत्पन्न झाला आहे. अप्रिय घटना घडू नये, यासाठी आदिवासींना जंगलाबाहेर आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आदिवासी मानतात की अधिकाºयांना भारी पडतात, हे सोमवारी कळेलच.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार यांना राजकुमार पटेल यांच्यासंबंधाने कडक शब्दांत सुनावले. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंबंधी आणि पोलीस कारवाईच्या शैलीविषयी त्यांनी नाखुशी दर्शविली.
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरून मी प्रशासनाला यापूर्वीही मदत केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मला मुद्दामच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविले. आता तर हद् झाली. घटनेशी दूरदूरचा संबंध नसलेले माझे नातेवाईकही शोधून-शोधून गुन्ह्यांत अडकविले. पोलिसांनी खोटे गुन्हे मागे घ्यावे आणि मगच मला मदत मागावी.
- राजकुमार पटेल,
माजी आमदार, मेळघाट
आदिवासींचे हाल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविले. त्यांनी कलेक्टर, एसपीला आदेश दिले. राजकुमार पटेलांना सोबत घेण्याच्या सूचना केल्यात. आम्ही सर्व सोमवारी जंगलात जाऊ, आदिवासींना बाहेर आणू.
- रवि राणा,
आमदार, बडनेरा