७१ वर्षीय आशाबाईने केले महाराष्ट्राचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:25 PM2018-03-07T23:25:04+5:302018-03-07T23:25:04+5:30
बंगळुरु येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व करून तिसऱ्या स्थानावर आणण्याची यशस्वी कामगिरी करणाऱ्या येथील ७१ वर्षीय आशाबाई शिरसाट यांना येत्या एप्रिलमध्ये महाराष्ट्र अॅथलेटिक्स क्रीडा सचिव डोमिनिक सॅव्हिओ यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येणार आहे. ही स्पर्धा २७, २८ फेब्रुवारी रोजी पाडली.
इंदल चव्हाण ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : बंगळुरु येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व करून तिसऱ्या स्थानावर आणण्याची यशस्वी कामगिरी करणाऱ्या येथील ७१ वर्षीय आशाबाई शिरसाट यांना येत्या एप्रिलमध्ये महाराष्ट्र अॅथलेटिक्स क्रीडा सचिव डोमिनिक सॅव्हिओ यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येणार आहे. ही स्पर्धा २७, २८ फेब्रुवारी रोजी पाडली.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा असोसिएशन सदस्य तथा काँग्रेसच्या जिल्हा संयोजिका आशाबाई शिरसाट यांचे क्रीडा क्षेत्रातील प्रभावी कामगिरीबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सत्कारदेखील झालेला आहे. ८ मार्च या जागतिक महिलादिनानिमित्त त्यांना सन २०१६ मध्ये राज्यस्तरीय अॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल अमरावती महापालिकेतर्फे क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल तत्कालीन महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदी पदाधिकाºयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्यांना तीन सुवर्णपदकदेखील मिळाले आहेत.
आशाबाई यांचा जन्म नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पळसमंडळ येथील शिंदे सावकार घराण्यात झाला. त्यांना शालेय जीवनापासूनच क्रीडाविषयी लळा होता. विद्यार्थी दशेत त्यांनी कैक क्रीडा पुरस्कार मिळविले आहेत. 'लोकमत' सखी मंचतर्फे विदर्भ अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना विवाहानंतर संसाराचा गाडा चालविताना त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्या १३ वर्षे पापळ जि.प. सर्कलच्या सदस्य राहिल्यात.
शेतीचे काम अद्यापही सुरू
आशाबाई शिरसाट यांच्या मालकीचे पळसमंडळ येथे ओलिताचे पाच एकर शेत आहे. त्या स्वत: शेतात राबतात. त्यांचा मुलगा बियाणे कंपनीत जनरल मॅनेजर असल्याने नवनवीन कृषी तंत्रज्ञानाविषयी त्यांना मार्गदर्शन मिळते. सध्या त्यांनी संकरित कोहळ्याची लागवड केली आहे. त्या बियाचा प्रयोग करणाºया त्या जिल्ह्यातील प्रथम शेतकरी महिला होत.