चार नगरपंचायतींसाठी ७२.११ टक्के मतदान
By admin | Published: November 2, 2015 12:24 AM2015-11-02T00:24:16+5:302015-11-02T00:24:16+5:30
जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली येथे नगर पंचायत निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
अमरावती : जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली येथे नगर पंचायत निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. धारणीत ६४. ३१, भातकुलीत ७९.३०, तिवसा ६९.८३ तर नांदगाव खंडेश्वर येथे ७५ टक्के मतदान झाले. चारही नगरपंचायतींसाठी सरासरी ७२.११ टक्के मतदान झाले. भातकुलीत मतदानादरम्यान थोडा गोंधळ उडाला होता. परंतु इतर तीन ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली.
तिवस्यात ६९.८३ टक्के मतदान
तिवसा : तिवसा नगरपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १७ प्रभागांसाठी ९१ उमेदवार रिंंगणात होते. ११ हजार ५८५ मतदारांपैकी ८ हजार ९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ४ हजार २८८ पुरुष, तर ३ हजार ९४२ महिलांचा समावेश आहे. सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारनंतर मतदानाचा वेग चांगलाच वाढला होता. येथे अतिशय शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. नगर पंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान झाल्याने युवकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. (प्रतिनिधी)
धारणीत ६४.३१ टक्के मतदान
धारणी : नगरपंचायत निवडणुकीत ६४.३१ टक्के मतदान झाले. सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला. प्रभाग क्र. ३,१०,१२,१४ येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा होती. सुरुवातीला पाचशे रुपये असलेली मतदाराची किंमत शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ७ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे बोलले जात होते. रोखऐवजी मागणीप्रमाणे मतदारांच्या घरापर्यंत 'भेटवस्तू' पोहोचविण्यात आल्याचीसुध्दा चर्चा होती.
नांदगावात १२० उमेदवारांचे भाग्य पेटीबंद
नांदगावखंंडेश्वर : येथे नगर पंचायतीच्या १७ प्रभागांसाठी शांततेत निवडणूक पार पडली. सुमारे १० हजार ७३ मतदारांपैकी ७ हजार ५५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७५ आहे. प्रभाग क्र. १ मध्ये एकूण मतदार ५१८ होते. त्यापैकी ४१७ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८०.५० टक्के इतकी आहे. प्रभाग क्र. २ मध्ये एकूण ७४२ पैकी ५६६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.