नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ७.२५ कोटींची विकासकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:55 AM2019-09-10T00:55:05+5:302019-09-10T00:56:28+5:30
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री, तीन आमदार आणि सत्तासमर्थक खासदार असतानाही विरोधी पक्षातील आमदार वीरेंद्र जगताप यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याच्या मुद्याची अनेक गावांत उपस्थितांनी विशेष दखल घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी रविवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन केले. सुमारे ७ कोटी २५ लाख रुपये खर्चून होणाऱ्या या विकासकामांमुळे या गावांचा चेहरामोहरा बदलणार आहे.
भूमिपूजनाला सामाजिक उपक्रमांची जोड देत आ. जगताप यांनी गिलबा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथे वृक्षारोपण केले. जनसुविधा, आमदार निधी, विशेष निधी, लेखाशीर्ष ३०५४, व्यायाम शाळा, सिमेंट रस्ते, नाली, समाज मंदिर, प्रवासी निवारा, पुतळा सौंदर्यीकरण आदी कामांचे भूमिपूजन केले.
मतदारसंघातील कोदोरी, शिंगोली, टाकळी कानडा, टाकळी गिलबा, धानोरा फसी, जयसिंगा, शेलुगुंड, वाटपूर, सिद्धनाथपूर, निमसवाडा या गावी लोकपयोगी कार्यासंबंधीचे कार्यक्रम पार पडताना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री, तीन आमदार आणि सत्तासमर्थक खासदार असतानाही विरोधी पक्षातील आमदार वीरेंद्र जगताप यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याच्या मुद्याची अनेक गावांत उपस्थितांनी विशेष दखल घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, विनोद चौधरी, दीपक सवाई, जयश्री कोहचडे, वैशाली रिठे, अनिता अडमते, रणजित मेश्राम, आशाताई सोनवणे, दिनेश केने, अरुण भगत, कल्पना घाटे, शकुंतला चक्रे, सुनील जैन, शीतल पारवे आदींची उपस्थिती होती.
येथे होणार विकासकामे
कोदोरी येथे शाळा खोली, व्यायामशाळा, स्मशानभूमी रस्ता व शेड, शिंगोली येथे मुख्य रस्त्याचे बांधकाम, टाकळी कानडा येथे भगवान गौतम बुद्ध पुतळा सौंदर्यीकरण, काँक्रीट रस्ता, स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण, टाकळी गिलबा येथे समाजमंदिर बांधकाम, टाकळी गिलबा ते कोव्हळा रस्त्यावरील पूल, धानोरा फसी-सार्सी, कोठोडा- माहुली चोर, सावनेर रस्त्यावर प्रवासी निवारा, शेलुगुंड स्मशानभूमी वॉल कंपाऊंड, जयसिंगा स्मशानभूमी पोचरस्ता, वाटपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण, पाण्याची टाकी ते गुरांच्या कोंडवाड्यापर्यंत, कब्रस्तानला चेनलिंक, फेन्सिंग, सिद्धनाथपूर अंतर्गत रस्ता व निमसवाडा येथील काँक्रिटीकरण या कामांचा समावेश आहे.