जिल्हा परिषद आरोग्य विभागात ७२६० लसी ठरणार कालबाह्य; बीसीजी, कोव्हॅक्सिन, पीसीव्ही लसीचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 07:40 PM2023-03-24T19:40:36+5:302023-03-24T19:41:17+5:30
Amravati News जनतेच्या करातून शासन तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेतून लसींची खरेदी करण्यात आली. मात्र, या लसींचा योग्य वेळी वापर न करण्यात आल्यामुळे आता या लसी कालबाह्य होणार आहेत.
गणेश वासनिक
अमरावती : जनतेच्या करातून शासन तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेतून लसींची खरेदी करण्यात आली. मात्र, या लसींचा योग्य वेळी वापर न करण्यात आल्यामुळे आता या लसी कालबाह्य होणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मार्चनंतर ७२६० लसी फेकण्यात येणार आहेत.
एकीकडे लसी उपलब्ध नसल्याने रुग्णांना परत जावे लागते आणि आता वापर न झालेल्या लसी कालबाह्य ठरत असल्याचे वास्तव आहे. जिल्हा परिषदेचे आराेग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी २० मार्च रोजी जारी केलेल्या पत्रानुसार ३१ मार्च रोजी मुदतबाह्य होणाऱ्या विविध लसींच्या वापराबाबत आणि साठ्याबाबत तालुका, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून माहिती मागविली आहे. ३१ मार्चपर्यंत वापरण्यात याव्यात, अन्यथा त्या लसी मुदतबाह्य ठरवून विल्हेवाट लावावी असे कळविले आहे. यात बीसीजी, कोव्हॅक्सिन, पीसीव्ही लसींचा समावेश असणार आहे.
आराेग्य यंत्रणेच्या माहितीनुसार बीसीजी लस ४२०, कोव्हॅक्सिन ६८२०, पीसीव्ही २० असे एकूण ७२६० एवढ्या लसी वापरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या लसी ३१ मार्चनंतर मुदतबाह्य ठरवून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. लोकांच्या पैशांच्या कसा दुरुपयोग होतो, हे दिसून येते.