७३९ शाळा झाल्या डिजिटल
By admin | Published: May 15, 2017 12:18 AM2017-05-15T00:18:17+5:302017-05-15T00:18:17+5:30
: शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील १ हजार ६०२ शाळांपैकी ७३९ शाळा मार्च अखेरपर्यंत डिजिटल झाल्या आहेत.
हातभार : सर्वच शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट, शिक्षण विभागाचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षण विभागाच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील १ हजार ६०२ शाळांपैकी ७३९ शाळा मार्च अखेरपर्यंत डिजिटल झाल्या आहेत. शाळांमध्ये अध्यापन करताना डिजिटल साधनांचा वापर झाल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयीची गोडी वाढेल. त्याचबरोबर शिकताना त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होईल, असे शिक्षणतज्ज्ञांच्या लक्षात आल्यानंतर शाळांमध्ये शिकविताना जास्तीत जास्त शैक्षणिक साधने व डिजिटल साधनांचा वापर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्वच १ हजार ६०२ शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने दिले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने नियोजन केले असून ग्रामपंचायतीची मदत, लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळांनी निधी गोळा करीत जिल्ह्यातील ७३९ शाळा डिजिटल केल्या आहेत.
शाळा डिजिटल करण्यासाठी संबंधित शाळेला एलईडी टीव्ही किंवा अॅन्ड्रॉईड मॅग्नेफाईन ग्लास, मायक्रो कॉस्ट डिव्हाईस, प्रोजेक्टर आदी साधने खरेदी करावे लागतात. शाळेला डिजिटल करण्यासाठी किमान २५ हजार ते जास्तीत जास्त ८५ हजार रूपयांपर्यंत खर्च येतो. प्रत्येक वर्ग डिजिटल करण्याचे उद्दिष्ट असले तरी हे उद्दिष्ट इतक्या लवकर पूर्ण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम शाळेतील किमान एक वर्ग डिजिटल करण्याकडे विशेष भर दिला जात आहे. शाळा डिजिटल झाल्यास अध्यापनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर डिजिटल साधनांचा वापर करून मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविता येणार असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित राहण्यास मदत होईल. कमी पटसंख्या असलेल्या शाळेला मोबाईल, मॅग्नेफाईन ग्लास व साऊंड वापरून शाळा डिजिटल करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित शाळाही लवकरच डिजिटल करण्यावर शिक्षण विभागाचा भर आहे.
१४ व्या वित्त आयोगातून कायापालट
ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीत डिजिटल वर्गखोल्यांचा उल्लेख असल्याने त्यातून ग्रामपंचायतींनी शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम तयार करणे आवश्यक आहे. अनेक ग्रामपंचायतींनी याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
तालुकानिहाय डिजिटल वर्गखोल्या
अमरावती ८२, अचलपूर ३३, अंजनगाव सुर्जी ४१, चांदूररेल्वे ४६, भातकुली २२, चांदूरबाजात १९, चिखलदरा १३६, धारणी ११५, दर्यापूर ९२, मोर्शी २६, धामणगाव रेल्वे ३७, तिवसा २०, नांदगाव खंडेश्वर ५१, वरूड १९ अशा एकूण ७३९ वर्ग खोल्या डिजिटल झाल्या आहेत.
सर्वशिक्षा अभियान, पेसा, १४ वा वित्त आयोग व इतर योजनांच्या माध्यमातून डिजिटल क्लासरूमचे काम जिल्हाभरात सुरू आहे. याशिवाय शासनाने रोटरी संस्थेशीही करार केला आहे. अशा विविध योजनांमधून डिजिटल वर्गाचे काम सुरू आहे. यामुळे भविष्यात सर्व शाळा डिजिटल केल्या जातील.
- एस.एम.पानझाडे,
शिक्षणाधिकारी प्राथमिक