अमरावती जिल्ह्यात आढळले ७४0 कर्करूग्ण
By admin | Published: May 30, 2014 11:21 PM2014-05-30T23:21:54+5:302014-05-30T23:21:54+5:30
जिल्हात तंबाखूजन्य आजारांचा वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत झालेल्या आरोग्य तपासणीत ७४0 रुग्ण कर्करोगाने ग्रस्त
अमरावती : जिल्हात तंबाखूजन्य आजारांचा वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत झालेल्या आरोग्य तपासणीत ७४0 रुग्ण कर्करोगाने ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असून महिलांमध्येही या रोगाची लक्षणे आढळून आली आहेत.
भारतात दरवर्षी ८५ हजार नागरिकांना कर्करोगाची लागण होत आहे. त्यामध्ये ५0 हजार नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण ३0 वर्षांवरील नागरिकांचे असून सद्यस्थितीत हे प्रमाण महिला व लहान मुलांमध्येही वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हात तबांखूचे व्यसन असणार्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवसे वाढत आहे. गुटखाबंदी लागू झाल्यावरही जिल्हाभरात सर्रासपणे गुटखा विक्री होत आहे. त्यामुळे गुटखा खाणार्यांचे प्रमाण वाढतच आहे.
तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे सर्वांना माहिती असतानाही तंबाखूच्या व्यसनापासून नागरिकांची सुटका होत नसल्याचे आजही दिसून येत आहे. तंबाखूच्या व्यसनापासून अन्य काही आजारांची उत्पत्ती होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. यामध्ये रुग्णांच्या प्राथमिक तपासणीत मधुमेह, कर्करोग, हृदयरोग व अर्धांगवायू या रोगांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालयात तसेच उपजिल्हा रुग्णालयांत ३0 वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात १0 ग्रामीण रुग्णालये व ४ उपजिल्हा रुग्णालयांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात एक मेडिकल ऑफिसर, एक परिचारिका, एक समुपदेशक व एक डाटा एन्ट्री ऑपरेटची नियुक्ती करण्यात आली आहे. ८ लाख १८ हजार १५४ नागरिकांची तपासणी केली असता ३ हजार ९६९ रुग्ण संशयीत आढळून आले. त्यापैकी ७४0 रुग्णांना कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ४८७ पुरुष तर २५२ महिलांना कर्करोग निष्पन्न झाले आहे.