अमरावती जिल्ह्यात कापूस उत्पादनात ७५ टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:08 PM2020-11-28T12:08:40+5:302020-11-28T12:10:56+5:30
Amravati News Cotton वरूड तालुक्यातील राजुरा बाजार हा कापूसपट्टा म्हणून ओळखला जात असून, यंदा कापूस उत्पादनात ७५ टक्के घट संभवत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कापूस वेचणी खर्च प्रतिक्विंटल एक हजारांपर्यंत गेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वरूड तालुक्यातील राजुरा बाजार हा कापूसपट्टा म्हणून ओळखला जात असून, यंदा कापूस उत्पादनात ७५ टक्के घट संभवते.
गतवर्षी एवढ्याच जागेवर कपाशी लागवड करून या वेळेस गतवर्षासारखा कापूस यंदा घरी आला नाही. उत्पादनात बरीच घट दिसून येत आहे. त्यातल्या त्यात कापसाचे बोंड कीडक निघत असल्याने कापसाचे वजन व दर्जा घसरला आहे. दरवर्षी कापूस वेचणी ही ५ ते ६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे व्हायची. परंतु यावर्षी कापूस वेचणी खर्च प्रतिकिलो १० ते १४ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बोंडअळी व बोंडसड त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. यंदा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील आहे.
यंदा सहा एकर कपाशीची लागवड केली. जेमतेम ११ क्विंटल कापूस घरी आला. खतांचे तीन डोज व पाच वेळा फवारणी केली. पण, यावर्षी अर्ध्यापेक्षाही कमी उत्पादन होईल, असे चित्र दिसून येत आहे.
- अतुल पाटील, शेतकरी, गाडेगाव