धामणगाव तालुक्यात शासकीय कर्मचाऱ्यांची ७५ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:05 AM2021-08-02T04:05:49+5:302021-08-02T04:05:49+5:30
कामाचा वाढला ताण चक्क धारणीला पसंती, एकाकडे चार ते पाच गावांचा कार्यभार मोहन राऊत /धामणगाव रेल्वे : तालुक्यातील दहा ...
कामाचा वाढला ताण
चक्क धारणीला पसंती, एकाकडे चार ते पाच गावांचा कार्यभार
मोहन राऊत /धामणगाव रेल्वे : तालुक्यातील दहा शासकीय विभागांतील तब्बल ७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे मागील चार वर्षांपासून पदे रिक्त आहेत. या जागेवर कर्मचारी येण्यास तयार नाहीत. धामणगावऐवजी धारणीला अधिक पसंती या कर्मचाऱ्यांनी दाखविली आहे. दरम्यान, एका कर्मचाऱ्यांकडे चार ते पाच गावाचा कार्यभार असल्याने कामाचा ताण अधिक वाढला आहे.
तिवसा व चांदूर रेल्वे तालुक्याचे विभाजन करीत धामणगाव तालुक्यातील ११२ महसुली गावे एकत्र करून १ ऑगस्ट १९९८ रोजी धामणगाव तहसील कार्यालयाची निर्मिती झाली. त्यानंतर तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय भूमिअभिलेख, सहायक निबंधक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह दहा नवीन कार्यालयांची निर्मिती झाली. मात्र, या विभागातील २३ वर्षांतही पदे भरण्यास शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे.
धामणगावऐवजी धारणीला पसंती
धामणगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानाच्या रेशन कार्ड, सातबारा दुरुस्ती, आठ-अ या कामाला काही अवधी लागला किंवा एकाद्या दिवशी कार्यालयात दहा मिनिट उशीर झाला तरी थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी होतात. वेळेवर काम करूनही काही जण शिवीगाळ करतात. त्यात तक्रारी करण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून कर्मचाऱ्यांना जेरीस आणले जाते . प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने इतर तालुक्यांतून येणारे कर्मचारी येथे न येता धामणगावऐवजी धारणीत बदली करून घेतात. चार वर्षांत बारा कर्मचाऱ्यांनी स्वतःहून धामणगाव सोडून मेळघाटात बदली करून घेतली आहे.
रिक्त पदे भरणार कधी?
संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदाराचे पद मागील तीन वर्षांपासून रिक्त आहे. नायब तहसीलदारांची दोन पदे भरली नाही. तब्बल सात गावांमध्ये तलाठी नाही. ११ गावांमध्ये कृषी सहायक नाही. तालुका कृषी अधिकारीचे पद प्रभारी आहे. वीज मंडळातील २३ तांत्रिक कर्मचारी कायमस्वरूपी नाहीत. पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी पद अद्यापही निर्माण झाले नाही. नऊ गावांमध्ये अद्यापही ग्रामसेवक नाहीत. सहायक निबंधक, बांधकाम विभागाचे प्उपविभागीय अभियंता प्रभारी आहेत. भूमिअभिलेख कार्यालयात रिक्त जागेची संख्या अधिक आहे.
कर्मचारी काय म्हणतात?
अमरावती, वर्धा, यवतमाळ तीन जिल्ह्यांचा केंद्रबिंदू म्हणून धामणगावात नोकरी करण्यात अधिक सुलभता असली तरी कर्मचारी, अधिकाऱ्यांनाला त्रास अधिक दिला जातो. खोट्या तक्रारी केल्या जातात, असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
ग्रामस्थ काय म्हणतात?
एखादी तक्रार करणे म्हणजे अधिकाऱ्यांना वेटीस धरणे नव्हे. शासकीय नोकरीत कमी-अधिक प्रमाणात कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो, असे प्रांजळ मत तालुक्यातील ग्रामस्थ व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
राजकीय नेते काय म्हणतात?
दोन वर्षांमध्ये धामणगाव मतदार संघातील ज्या विभागातील पदे रिक्त आहेत त्यांचा आराखडा तयार करून राज्याच्या मंत्रालयात सादर केला. ही पदे भरण्याची मागणी केली असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले.
मागील अनेक वर्षांपासून नोकरभरती नाही. त्यामुळे राज्यातील अनेक पदे भरले नाहीत. मतदारसंघातील शासकीय कार्यालयातील पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी म्हटले.
काही कर्मचारी वेळेवर काम करीत नाही याचा अनुभव आपण मागील काही वर्षांमध्ये घेतला आहे. तालुक्यातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयराव भैसे यांनी सांगितले.