३५ दिवसांत ७५ गावे ओडीएफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:31 AM2018-02-02T01:31:44+5:302018-02-02T01:32:14+5:30
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे.
ऑनलाईन लोकमत
अमरावती : मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस मेळघाटातील विविध गावांमध्ये मुक्काम केला होता. बुधवार, ३१ जानेवारी रोजी या सर्वांनी सीईओ किरण कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यशाळेत अनुभव कथन केले.
कार्यक्रमाला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक सी.एच वाकडे, मुख्य वनसंरक्षक हेमंत मिणा, आरडीसी नितीन व्यवहारे, के.एस. अहमद, विनय ठमके, संजय इंगळे, कैलास घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व अन्य अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प सीईओ किरण कुलकर्णी यांनी केला. त्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारंवार बैठकी घेतल्या. १४ पैकी १२ तालुक्यांत बºयापैकी यशही आले; मात्र मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यात डिसेंबरअखेरीस १३ हजार ५२२ एवढे उद्दिष्ट शिल्लक होते. माघारलेल्या या दोन तालुक्यांत सीईओ किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून डेप्युटी सीईओ संजय इंगळे व त्यांच्या सहकारी चमूने नियोजन करताना ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ ही संकल्पना मांडली. यातून मेळघाटसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यासाठी सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग घेत धारणीतील ९१ व चिखलदऱ्यातील २३ अशी ११४ गावे हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प सोडला. जि.प. पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनने राबविल्या या ३५ दिवसांच्या मोहिमेत ९७ पैकी ७५ गावे ओडीएफ केली आहेत. यासाठी झेडपीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेळघाटातील गावांमध्ये स्वत: पोहोचून तेथील नागरिकांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहीत केले. याशिवाय खड्डे खोदणे ते साहित्य उपलब्ध करून देण्यापर्यंत व गवंड्यांकडून बांधकाम पूर्ण करून घेण्यापर्यंतची कामे केली. येत्या फेब्रुवारीपर्यंत उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करून जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी सोडला.