७६ ग्रापं.सचिवांना सीईओंचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 12:10 AM2017-06-22T00:10:12+5:302017-06-22T00:10:12+5:30
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्ह्याला सन २०१७-१८ वर्षासाठी देण्यात आलेले ८४ हजार वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट्य अद्याप बाकी आहे.
अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्ह्याला सन २०१७-१८ वर्षासाठी देण्यात आलेले ८४ हजार वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट्य अद्याप बाकी आहे. अशा ७६ ग्रापंच्या सरपंच व सचिवांना १५ जुलैपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम सीईओ किरण कुलकर्णी यांनी दिला आहे.
पाणीपुरवठा, स्वच्छता मिशन कक्षामार्फत जिल्ह्याला वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ भारत मिशन कक्षाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे सहकाऱ्यांसह परिश्रम घेत आहेत. मात्र, काही ग्रामपंचायतींतर्गत शौचालयाच्या बांधकामाची गती मंदावली आहे. जिल्ह्यातील तब्बल ७६ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. याची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन येत्या १५ जुलैपर्यंत ७६ ग्रामपंचायतींमध्ये वैयक्तिक शौचालयांचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात यावे, अन्यथा संबंधित ग्रामपंचायत सरपंच व सचिव तसेच नोडल अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सीईओ किरण कुलकर्णी व डेप्युटी सीईओ संजय इंगळे यांनी दिला आहे. यामुळे उपरोक्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड ळबळ उडाली आहे.