76 वर्षांची परंपरा, हजारो अपंग, 14 जणांचा मृत्यू, पांढुर्ण्याच्या गोटमार यात्रेत ६०० जखमी, आठ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:07 AM2024-09-05T11:07:38+5:302024-09-05T11:11:03+5:30
Amravati News: अमरावती येथून ३५ कि.मी.वर असलेल्या मध्य प्रदेशातील सावरगाव आणि पांढुर्ण्याच्या भाविकांमध्ये जांब नदीतील झेंडा बळकावण्याची प्रसिद्ध गोटमार यात्रा मंगळवारी पार पडली. सकाळी सहा वाजता गोटमारीला सुरुवात झाली.
- संजय खासबागे
वरूड (जि. अमरावती) - येथून ३५ कि.मी.वर असलेल्या मध्य प्रदेशातील सावरगाव आणि पांढुर्ण्याच्या भाविकांमध्ये जांब नदीतील झेंडा बळकावण्याची प्रसिद्ध गोटमार यात्रा मंगळवारी पार पडली. सकाळी सहा वाजता गोटमारीला सुरुवात झाली. सायंकाळी सात वाजता पांढुर्णा आणि सावरगावच्या भाविकांनी दोन्ही पक्षांच्या सहमतीने पळसाचा झेंडा काढून विधीवत पांढुर्ण्याच्या भाविकांकडे सोपवला. झेंडा बळकावण्याच्या चढाओढीत दगडांच्या माराने ६०० हून अधिक भाविक जखमी झाले.
प्रशासनाचा विरोध डावलून यात्रा
प्रशासनाने विरोध केला तरी ही गोटमार श्रावणी अमावास्येला पूर्वापार सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने पांढुर्णा जिल्हाधिकारी अजयदेव शर्मा, पोलिस अधीक्षक सुंदरसिंह कनेश यांच्या उपस्थितीत महसूल आणि पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.
काय आहे आख्यायिका
- प्रेमीयुगुलांच्या आख्यायिकेच्या आधारावर दोन गावांना विलग करणाऱ्या जांब नदीपात्रात रोवलेला पळसाच्या झाडावरील झेंडा काढण्याकरिता भाविकांमध्ये चढाओढ होते.
- भाविकांचे श्रद्धास्थान चंडी मातेच्या मंदिरात झेंडा नेला जातो. यामध्ये पांढुर्णा आणि सावरगावचे भाविक सहभागी होऊन झेंडा काढण्यास गेल्यावर दगडफेक करतात. गोटमारीमुळे ७६ वर्षांत हजारो लोकांना अपंगत्व आले, १४ लोकांनी प्राण गमावले.