रोहयो'च्या कामावर राबताहेत ७६ हजार मजुर; जिल्हाभरात ग्रामपंचायत,यंत्रणेकडून ६ हजार २०५ कामे
By जितेंद्र दखने | Published: June 13, 2024 11:08 PM2024-06-13T23:08:26+5:302024-06-13T23:08:40+5:30
अशातच सध्या पावसाळयाचे दिवस सुरू झाले असल्यामुळे शेतीचीही कामे सुरू झाली आहे. असे असतांना आजघडीला जिल्हाभरात रोजगार हमी योजनेच्या ६ हजार २०५ कामावर ७६ हजार ९५१ एवढे मजूर कार्यरत आहेत.
अमरावती : मजुरांचे स्थलांतर थांबावे या उद्देशाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातच रोजगाराची उपलब्धता केली जाते. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ८२४ ग्रामपंचायतींसह विविध यंत्रणेच्या माध्यमातून ६ हजार २०५ कामे सुरू असून त्यातून ७६ हजार ९५१ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
खरीप आणि रब्बी हंगाम आटोपल्यानंतर जिल्ह्यातील अनेकांच्या कामाला हात उपलब्ध होत नाही. परिणामी अनेकांच्या नशिबी कामाच्या शोधार्थ स्थलांतर येते. हे स्थलांतर थांबावे याकरिता महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी (रोहयो) योजनेतून पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील विविध गावांत आजघडीला घरकुल, स्वच्छतागृह, विहीर, गोठा बांधकाम या वैयक्तिक लाभाच्या कामासह शेततळे, वृक्षलागवड, बांबू लागवड साखळी कुंपण, ग्रामपंचायत भवन,सलग समतलतर अशा प्रकारची कामे जॉबकार्डधारक कामगारांच्या माध्यमातून केली जातात. यंदा उन्हाळ्यात जिल्हाभरात जवळपास ७ हजार कामांवर ८० हजारावर मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
अशातच सध्या पावसाळयाचे दिवस सुरू झाले असल्यामुळे शेतीचीही कामे सुरू झाली आहे. असे असतांना आजघडीला जिल्हाभरात रोजगार हमी योजनेच्या ६ हजार २०५ कामावर ७६ हजार ९५१ एवढे मजूर कार्यरत आहेत. रोजगार हमी योजनेतंर्गत मागेल त्याला काम उपलब्ध असल्याचे रोजगार हमी योजना विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी आहेत तालुकानिहाय कामे
तालुका -कामे - मजूर संख्या
अचलपूर-७९५-२६११
अमरावती-३१२-२०३०
अंनजगाव सुजी-८७-५७६
भातकुली-२०६-११००
चांदूर रेल्वे-२३४-१९८२
चांदूर बाजार -३७४-२३५४
चिखलदरा-९८४-३३२५१
दर्यापूर-३४१-१३०४
धामणगांव रेल्वे-३१७-२२६१
धारणी-५३४-११३२१
मोर्शी-५८३-६७७३
नांदगाव खंडेश्वर-४६२-३१७१
तिवसा-४३७-३५१३
वरूड-५३९-४७०४
रोजगार हमी योजनेतंर्गत ग्रामपंचायत व यंत्रणा मिळून १३ जूनपर्यंत ६२०५ कामांवर ७६९५१ एवढ्या मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले आहे. रोहयोंतर्गत सध्या ग्रामीण भागातील १४ तालुक्यांमधील विविध गावांत विविध प्रकारची कामे सुरू आहेत.
संजय खारकर
उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो जि.प. अमरावती