पसंतीच्या क्रमांकांतून परिवहनला ७७ कोटींचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 05:26 AM2017-11-27T05:26:33+5:302017-11-27T05:27:04+5:30
आवडीचा वाहन क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी भरघोस पैसे मोजल्यामुळे एप्रिल ते आॅक्टोबर या काळात परिवहनच्या १२ विभागीय कार्यालयांना तब्बल ७७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
- प्रदीप भाकरे
अमरावती : आवडीचा वाहन क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी भरघोस पैसे मोजल्यामुळे एप्रिल ते आॅक्टोबर या काळात परिवहनच्या १२ विभागीय कार्यालयांना तब्बल ७७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. राज्यभरातील ९९ हजारांवर वाहनधारकांनी पाच हजार ते तब्बल अडीच लाख रुपये भरून हे ‘चॉइस नंबर’ मिळविले आहेत. त्यातील १७ जणांनी, तर अडीच लाख रुपये किंमत असलेले क्रमांक ७१ लाखांना मिळविले. २३.४५ कोटी रुपये महसूल मिळवून पुणे विभाग यामध्ये अव्वल ठरला आहे.
वाहनधारकांच्या विशिष्ट क्रमांकावर पडणाºया उड्या लक्षात घेऊन आरटीओनेही त्यातून महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले. हौशी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्याअनुषंगाने आरटीओने ०१ व ९९९९ या क्रमांकासह ०७८६, १११, ४४४, ५५५ असे विविध चॉइस नंबर उपलब्ध केले. ०००१ या क्रमांकासाठी तर अडीच ते तीन लाख रुपये आकारणी केली जाते. पाच हजारापासून ते अडीच लाख रुपयांच्या पुढे हे क्रमांक उपलब्ध आहेत.