३० ते ४४ वर्षे वयोगटातील ७.९९ लाख नागरिकांचे होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:15+5:302021-06-20T04:10:15+5:30
अमरावती : १८ वर्षांवरील तरुणांना आता विनानोंदणी लस देण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या ...
अमरावती : १८ वर्षांवरील तरुणांना आता विनानोंदणी लस देण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाद्वारे शनिवारपासून ३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे ऑफलाईन लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात या वयोगटात ७,९९,४५५ नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
महापालिका क्षेत्रात आयसोलेशन दवाखाना, शहरी आरोग्य केंद्र (भाजीबाजार), मनपा दवाखाना (मसानगंज), मोदी हॉस्पिटल (बडनेरा), शहरी आरोग्य केंद्र (दस्तुरनगर), शहरी आरोग्य केंद्र (विलासनगर) तसेच ग्रामीणमध्ये भातकुली या एकमेव केंद्रावर शनिवारी लसीकरण करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक प्रभावी उपाययोजना असलेल्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर लगेच दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तर चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सहव्याधी आजाराचे नागरिक, या नंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिक व आता ३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोना लसीच्या पुरवठ्याअभावी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तीन आठवड्यापासून थांबविण्यात आले आहे. यापुढे केंद्रांवर गर्दी वाढू नये, याकरिता आता ३० ते ४४ वर्षे दरम्यानचा सहावा टप्पा शासनाने सुरू केला आहे.
बॉक्स
आतापर्यंत ५,४८,५०६ नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ५,४८,५०६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये ३४,७७६ हेल्थ केअर वर्कर, ५३,२२८ फ्रंट लाईन वर्कर, १८ ते ४४ वर्षे वयोगटात २८,८६४, ४५ ते ५९ वर्षे वयोगटात २,०१,५३९ व ६० वर्षांवरील २,३०,०९९ नागरिकांचा समावेश आहे. यापैकी ४,०७,३७० नागरिकांनी पहिला व १,४१,१३६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
बॉक्स
५,५५,१४० डोसचा आतापर्यंत पुरवठा
जिल्ह्यात आतापर्यंत ५,५५,१४० डोसचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामध्ये ४,३६,८३० कोविशिल्ड, तर १,१९,३१० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. यामध्ये कोविशिल्डचा ४,३७,६५० नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे. कोव्हॅक्सिनमध्ये १,१०,८५६ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
कोट
शासनाच्या निर्देशानुसार, शनिवारपासून ३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. सध्या सहा केंद्रांवर ही सुविधा आहे.
डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी
पाईंटर
प्राप्त लसी
कोविशिल्ड :४,३६,८३०
कोव्हॅक्सिन : १,१९,३१०
लसीकरणाची स्थिती
झालेले लसीकरण : ५,४८,५०६
पहिला डोस : ४,०७,३७०
दुसरा डोस : १,४१,१३६