अमरावतीत ८ नोव्हेंबरला सुकाणू समितीतर्फे नोटाबंदीचे वर्षश्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:32 PM2017-11-02T13:32:18+5:302017-11-02T13:36:57+5:30
शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध व त्यानंतर राज्यभर टप्प्याटप्प्यांत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे राज्य प्रतिनिधी धनंजय काकडे यांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध व त्यानंतर राज्यभर टप्प्याटप्प्यांत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे राज्य प्रतिनिधी धनंजय काकडे यांनी दिली.
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच शेतकरी अडचणीत आला असून, त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. शहर विकासाच्या नावावर ग्रामीण भागाची लूट होत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या वीज बिलाची अन्यायकारक वसुली थांबवावी, यासाठी १ नोव्हेंबरपासून महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकून शेतकऱ्यांना स्वत:चे कनेक्शन तोडण्याचे आवाहन समितीने केले होते. आता ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध होणार आहेत. संपूर्ण कर्जमुक्ती व शेतमालाच्या रास्त हमीभावासाठी शेतकरी १० नोव्हेंबरपासून तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन, दूध व शेतीमाल टाकून घंटानाद करणार आहेत. यानंतरही शासनाला जाग न आल्यास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील व सुकाणू समितीचे राज्य समन्वयक अजित नवले यांच्या मार्गदर्शनात राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.