अमरावतीत पिसाळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात 8 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 05:22 PM2017-10-21T17:22:47+5:302017-10-21T17:23:30+5:30
काटेरी सायाळच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लांडग्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव शेतशिवारात आठ जणांवर हल्ला केला.
अमरावती - काटेरी सायाळच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लांडग्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव शेतशिवारात आठ जणांवर हल्ला केला. शनिवारी (21 ऑक्टोबर )पहाटे ही घटना घडली आहे. जखमींपैकी चार जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात ऊपचार सुरू आहेत.
अशोक कवडू चौके (वय ३२ वर्षा ), अनिल तामखाने (वय ३७ वर्ष), वत्सलाबाई मोतीराम मुंडवाईक (वय ६५ वर्ष), संजय मोतीराम मुंडवाईक, शे. सलीम शे. करीम (वय ४६ वर्ष), दीपक प्रभाकर दिवेकर (वय ४० वर्ष), सुरेश भीमराव खडसे (वय ५५वर्ष) तसेच हनुमान भोयर (वय ६७वर्ष) व कांता भोयर अशी जखमींचं नावं आहेत. यातील भोयर दाम्पत्यासह चौघांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील फुबगाव शिवारात जखमी लांडग्याने पहाटेच्या सुमारास गावात प्रवेश केला. समोर येईल त्या व्यक्तीवर हा लांडगा हल्ला करत सुटला होता. अंधार असल्याने नेमका कोणता प्राणी आहे हे ओळखता येण कठीण होतं. यामुळे दहशत वाढत गेली.
दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तीन किलोमीटर अंतरावरील शिंगणापूर शिवारात लिंबाच्या बागेत तिघांवर लांडग्याने हल्ला चढविला. त्यांनी मात्र या चवताळलेल्या लांडग्याला जिवंत पकडले व वनविभागाच्या ताब्यात दिले. यानंतर परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. घटनास्थळी वनरक्षक सुधीर काळपांडे, अविनाश मते, पोलीस उपअधीक्षक दिलीप सहारे, मंडळ अधिकारी मंगेश मार्कंड, प्रमोद ढवळे दाखल झाले होते.
वनविभागाच्या अधिका-यांनी लाडंग्याला जेरबंद केल्यावर तो काटेरी सायळच्या हल्ल्यात जखमी झाल्याचे उघडकीस आले. एक काटा त्याच्या तोंडात रुतून बसल्यामुळे तो अधिकच चवताळला. हा लांडगा बेंबळा नदीपात्रालगत कोंडेश्वर साखर कारखान्याच्या पडीक जमिनीवरील जंगलात वास्तव्यास असावा, अशी शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.
लांडग्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना वनविभागाच्या माध्यमातून वरित आर्थिक मदत मिळावयास हवी. - अमोल धवस, सरपंच, फुबगाव
लांडग्याने सायाळची शिकार करण्याचा प्रयत्न केला असावा. यामुळे सायाळचे काटे त्याच्या तोंडात व शरीरात अडकले होते. यामुळेच तो चवताळला असावा. आम्ही त्याला जेरबंद केले आहे. - सुधीर काळपांडे, वनरक्षक, नांदगाव खंडेश्वर