८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:29+5:302021-06-06T04:10:29+5:30
चांदूर बाजार : यावर्षी सोयाबीन बियाण्याची टंचाई पाहता, मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, ...
चांदूर बाजार : यावर्षी सोयाबीन बियाण्याची टंचाई पाहता, मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
देशाच्या उंबरठ्यावर मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या काही दिवसांत राज्यातही मान्सून बरसेल. परंतु, त्याआधी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी एखाददुसरा पाऊस आल्यास, शेतकरी पेरणीची घाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपूर्ण पावसावर पेरणी केल्यास त्यानंतर चार ते पाच दिवसांचा पावसाला विलंब झाल्यास, पेरणी उलटण्याची दाट शक्यता असते. अशावेळी दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही. ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी केल्यास जमिनीत पुरेसा ओलावा असल्यामुळे पुढील पाच ते आठ दिवस पाऊस नसला तरी पेरलेले बियाणे निघून पिक तग धरू शकते. अशावेळी पेरणी उलटण्याची शक्यता अत्यल्प राहते. तरी शेतकऱ्यांनी पुढे पाऊस येईल, या आशेवर कमी पावसावर पेरणी करण्याची घाई करू नये. पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे योग्य ठरेल.
सध्या शेतकऱ्यांनी खरिपातील कापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग, मका, उडीद,मूग ,यासह खरिपातील ईतर पिकांच्या पेरणीचे नियोजन करावे तसेच जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकांची निवड करावी. खरीपपूर्व मशागत झालेल्या शेतात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यास, वखराच्या पाळ्या देऊन शेत खरीप पेरणीसाठी तयार करावे, असा सल्लाही कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.