८० टक्के पावसाळा संपला, जलसाठा ५० टक्केच उरला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 03:07 PM2023-09-09T15:07:29+5:302023-09-09T15:13:50+5:30
अपुरे पर्जन्य : १५ लघु प्रकल्पांच्या साठ्यात झपाट्याने होत आहे घट
अमरावती : जूनमध्ये तीन आठवडे मान्सूनला विलंब झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही पावसाची दडी, त्यामुळे पावसाची तूट आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ लघु प्रकल्पांमध्ये अद्याप ५० ते ६० टक्केच जलसाठा आहे. यातही झपाट्याने घट होत आहे. त्यातच ८० टक्के पावसाळा आता संपलेला आहे. त्यामुळे प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पावसाळ्याचे जून ते सप्टेंबर म्हणजेच १२० दिवस गृहीत धरण्यात येतात. यातील ९३ दिवस पार झाले तरी जिल्ह्यात ४० टक्के तूट आहे. जिल्ह्यात केवळ चांदूरबाजार तालुकावगळता १३ तालुक्यांत पावसाची ६० ते ३० टक्क्यांपर्यंत तूट आहे. केवळ जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली होती. त्यामुळे ही सरासरी दिसून येत आहे. दशकात यंदा सर्वांत कमी पाऊस ऑगस्ट महिन्यात झाला आहे. त्यामुळे लघु प्रकल्पात पुरेसा साठा झालेला नसल्याचे चित्र आहे.
केवळ नांदगाव तालुक्यातील पिंपळगाव, मोर्शी तालुक्यातील दाभेरी, वरुड तालुक्यातील लोणी धवलगिरी, धारणी तालुक्यात रभांग, मोगर्दा व बोबदो लघु प्रकल्पात शत-प्रतिशत जलसाठा आहे.
या लघु प्रकल्पात जलसाठा कमी
१) मालखेड, बासलापूर, जळका, भिवापूर, बेलसावंगी, साद्राबाडी, गावलानडोह, सावलीखेडा, मांडवा, सालई, गंभेरीसह अनेक लघुप्रकल्पांवर ५० ते ७० टक्के एवढाच जलसाठा आहे.
२) लघुप्रकल्पाची साठवण क्षमता कमी असल्याने जलसाठ्यात झपाट्याने कमी येत असते. त्यामुळे लघुप्रकल्प परिसरात दमदार पाऊस होईस्तोवर या प्रकल्पात जलसाठा वाढणार नाही.