दुष्काळी २८ तालुक्यांना ८०० कोटींचा मदतनिधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 06:30 PM2019-02-28T18:30:32+5:302019-02-28T18:30:35+5:30
यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला ‘एनडीआरएफ’ची ८०० कोटी ४१ लाखांची मदत मिळणार आहे.
गजानन मोहोड
अमरावती : यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला ‘एनडीआरएफ’ची ८०० कोटी ४१ लाखांची मदत मिळणार आहे. आतापर्यंत ४७४ कोटी ३६ लाखांची मदत वितरित करण्यात आली, तर २२ फेब्रुवारीला तिस-या टप्प्याचे ३२६ कोटी पाचही जिल्ह्यांना वितरित करण्यात आले. सद्यस्थितीत सहा लाख ८९ हजार ७२८ शेतक-यांच्या बँक खात्यात ३४६ कोटी ९७ लाखांचा मदतनिधी जमा करण्यात आलेला आहे.
दुष्काळ व्यवस्थापन संहिता-२०१६ च्या निकषानुसार विभागातील २८ तालुक्यांत दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागल्याने शासनाने ३१ ऑक्टोबर २०१८ ला २८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. याच तालुक्यांना २५ जानेवारीला दुष्काळनिधीची मदत जाहीर केली. या सर्व तालुक्यांत पीक कापणी प्रयोगानंतर कृषी विभागाद्वारा सत्यापन करण्यात आले होते. त्यानुसार या सर्व तालुक्यांत ६,७२,६६३ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने केंद्रीय आपदा निधीमधून ही मदत देण्यात येत आहे.
कृषी विभागाच्या सत्यापनानुसार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात ४२,९८८ हेक्टर, चिखलदरा २२,९७६, मोर्शी ५८८४९, वरूड ४९४१४, अंजनगाव सुर्जी ४१६९५, अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात ४७३१, अकोला ३६४, तेल्हारा ५४५९, बाळापूर ६२९६, बार्सी टाकळी २३११ यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ तालुक्यात ६२.२९, बाभुळगाव ५९.९९, कळंब ८६.८६, राळेगाव ७८.८९, मारेगाव ९१.७७, केळापूर १३८.२३, दारव्हा ६४.७७, महागाव ७५.२२ व उमरखेड तालुक्यात ८०.४ हेक्टर बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात ५८७१४ हेक्टर, मलकापूर ४२३५७, खामगाव ७५३७०, शेगाव ४६७५३, नांदूरा ५०१०४, संग्रामपूर ४२७१४, लोणार ५२४२४, व सिंदखेडराजा ६४१०१ तसेच वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात ४३०३.१९ हेक्टरसाठी ही मदत आहे.
कमी पैसेवारीच्या ४७९१ गावांना डावलले
दुष्काळाच्या नव्या संहितेनुसार शासनाने ३१ ऑक्टोबरला विभागातील २८ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. यामध्ये २००७ गावांत दुष्काळ स्थिती शासनाने जाहीर केली व आता एनडीआरएफचा मदतनिधी देखील वितरित केला. महसूल विभागाने ३१ डिसेंबरला खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर केली. यामध्ये जाहीर दुष्काळी गावे वगळता ४७९१ गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी आहे. मात्र, या गावांना मदतनिधीत डावलण्यात आले, तर दुष्काळासंदर्भातील फक्त आठ सवलतींवर या गावांची बोळवण करण्यात आलेली आहे.
असा मिळाला जिल्हानिहाय निधी
अमरावती जिल्ह्यात ७३८ गावांतील १४९८५७ शेतक-यांसाठी १८६ कोटी ३६ लाख, अकोला जिल्ह्यात ६२३ गावांतील १४९६१८ शेतक-यांसाठी १३७ कोटी ६१ लाख, बुलडाणा जिल्ह्यातील ५९९ गावांतील १९८००६ शेतक-यांसाठी १९९ कोटी ६५ लाख, यवतमाळ जिल्ह्यात १११६ गावांतील २३४४१८ शेतक-यांसाठी २३२ कोटी ६७ लाख व वाशिम जिल्ह्यात १०० गावांतील ५५११५ शेतक-यांसाठी ४४ कोटी १० लाखांचा निधी आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे.