मध्य रेल्वेला तीन महिन्यांत भंगारातून ८१.६४ कोटींचा महसूल
By गणेश वासनिक | Published: July 13, 2023 03:58 PM2023-07-13T15:58:40+5:302023-07-13T15:59:57+5:30
‘झीरो स्क्रॅप मिशन’ उपक्रम राबविला, पाच विभागात भंगार विक्रीला प्राधान्य
अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाला एप्रिल ते जून २०२३ या तीन महिन्याच्या कालावधीत भंगाराच्या विल्हेवाटीतून ८१.६४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गव्हर्नमेंट ई-मार्केट (जेम) मध्य रेल्वेवरील ऑनलाइन खरेदी प्रणाली विक्रेत्यांना समान संधी, कामात पारदर्शकता तसेच सुरक्षितता आणि प्रवासी सुविधांच्या वस्तूंची १०० टक्के उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मुंबई विभागांतर्गत प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी ‘झीरो स्क्रॅप मिशन’ साध्य करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जून २०२३ मध्ये भंगार विक्री ३६.३५ कोटी झाली आहे आणि त्यानुसार एप्रिल ते जून २०२३ या कालावधीसाठी एकत्रित विक्री ८४.६४ कोटी आहे. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत उद्दिष्टापेक्षा ३६.०६ टक्के जास्त आहे. मध्य रेल्वेचे भंगार विक्रीचे वार्षिक उद्दिष्ट ३०० कोटी आहे. यामुळे २०२३ साठी पं. गोविंद बल्लभ पंत शिल्डच्या निकषांमध्ये २२ पैकी १० पॅरामीटर्समध्ये मध्य रेल्वे क्रमांक १ वर आली आहे.
भंगाराची विक्री मध्य रेल्वेच्या मुंबई (माटुंगा कार्यशाळा), पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर येथे विविध ठिकाणी करण्यात आली आहे. विकल्या जाणाऱ्या भंगाराच्या प्रमुख वस्तूंमध्ये ईएमयू कोच, आयसीएफ कोच, लोकोमोटिव्ह, वॅगन्स आणि इतर भंगाराचा समावेश आहे.
एप्रिल ते जून-२०२३ कालावधीसाठी जेमद्वारे भंगारातून सेवा आणि वस्तूमधून ११०.८९ कोटी मिळाले आहे. नव्या प्रणालीमुळे मटेरिअल, मॅनेजमेंट, सेक्शनने सुरक्षितता आणि प्रवासी सुविधांच्या वस्तूंची १०० टक्के उपलब्धता राखली आहे. त्यामुळे सुरक्षा सामग्रीची कमतरता नाही याची खात्री होत आहे.
- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.