८३९ ग्रामपंचायतींचे होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’

By admin | Published: April 13, 2017 12:08 AM2017-04-13T00:08:08+5:302017-04-13T00:08:08+5:30

जिल्हाभरातील १४ पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ८३९ ग्रामपंचायतींचे येत्या ३ ते ६ मे दरम्यान एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक केले जाणार आहे.

83 9 Gram Panchayats to be organized on 'Surgical Strike' | ८३९ ग्रामपंचायतींचे होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’

८३९ ग्रामपंचायतींचे होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’

Next

तपासणी: सर्व कामांचे मूल्यमापन; १० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश
अमरावती : जिल्हाभरातील १४ पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ८३९ ग्रामपंचायतींचे येत्या ३ ते ६ मे दरम्यान एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्यात बहूदा पहिला ठरणार आहे.
ग्रामस्तरावर विकासाचा मुख्यकेंद्र बिंदू म्हणून ग्रामपंचायत ही ग्रामविकासात महत्वाची संस्था आहे. या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम ग्रामविकासाठी राबविले जातात. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विकास कामांसोबतच विविध योजना स्थानिक पातळीवर सुध्दा राबविल्या जातात. यासाठी वर्षभर होणारे प्रशासकीय कामकाज सुध्दा तेवढेच गतीमान असावे हा हेतू लक्षात घेता, आतापर्यत विभागीय आयुक्त, सीईओ, विस्तार अधिकारी यांच्या माध्यमातून ग्रामपंचातींच्या दप्तरांची तपासणी केली जात होती. मात्र या अधिकाऱ्यांवर कामांचा वाढता व्याप लक्षात घेता बहुदा दप्तर तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचणी येत होत्या. या प्रार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत विभागाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीसाठी नवीन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर ११ एप्रिल रोजी ग्रामपंचायत तपासणी साठी समर्थ हायस्कुल येथे पहिली कार्यशाळा सुध्दा घेण्यात आली आहे.

काय होणार फायदे?
ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामातील थंडावलेली प्रक्रिया गतीमान होईल. १ ते ३३ नमूने तसेच शासनाकडून मिळालेला निधी, त्याचा झालेला विकास कामांवरील जमा खर्च, स्थानिक सुविधा, कर वसुली, ग्रामसभा, अशी महत्वाची कामे या तपासणी मुळे गतीमान होतील. कुठलेही काम हे ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीच पूर्ण होऊन नवीन आर्थिक वर्षातील कामे करण्यास मदत होणार आहे.

दीडशे अधिकारी नियुक्त
जिल्ह्यातील८३९ ग्रामपंचायतींच्या तपासणी एकाच वेळी तीन दिवस केली जाणार आहे. याकरिता १५० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यात १० जणांचे पथक राहील. पथक प्रमुख म्हणून सहायक गटविकास अधिकारी हे राहतील. विस्तार अधिकारी पंचायत, आरोग्य, कृषी, समाज कल्याण तसेच प्रशासन अधिकारी आदींचा समावेश पथकात आहे. हे पथक नेमून दिलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय दप्तरांची तपासणी करणार आहे.

वर्गवारी ठरणार
जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणी मोहिमेत उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज करणाऱ्या ग्रामपंचायतींनुसार तालुकानिहाय वर्गवारी ठरविली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व तपासणी क्रॉस चेकींग होणार आहे. तपासणी पथकाचा दौरा गोपनीय राहणार असून पंचायत समितीला दोन दिवस अगोदर तालुक्यात पथक येणार असल्याची माहिती दिली जाईल. मात्र कुठल्या ग्रामपंचायतीची तपासणी होईल, हे वेळेवरच स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषद पंचायत विभागाने ग्रामपंचायतींचे दस्तऐवज एकाच वेळी तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कामकाज विहित कालावधीतच पूर्ण व्हावे, यासाठी हा नवीन उपक्रम राबविला जाणार आहे.
जे. एन. आभाळे
डेप्युटी सीईओ,(पंचायत)

Web Title: 83 9 Gram Panchayats to be organized on 'Surgical Strike'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.