जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतींना तीन दिवस टाळे : कामकाज पडले ठप्प
By जितेंद्र दखने | Published: December 18, 2023 09:02 PM2023-12-18T21:02:57+5:302023-12-18T21:03:09+5:30
एकाच वेळी १८ ते २० डिसेंबरदरम्यान कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
अमरावती: राज्यातील ग्रामपंचायतींसंदर्भात सर्वच घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक संघटना एकाच वेळी १८ ते २० डिसेंबरदरम्यान कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संपामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कारभार ठप्प झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने यासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन शासन व प्रशासनाने न्यायिक मागण्या सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलाकर वनवे, सरचिटणीस आशिष भागवत, प्रशांत टिंगणे, मनीष इंगोले आदींसह पदाधिकारी व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
..अशा आहेत ग्रामसेवकांच्या मागण्या
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी त्यांच्याकडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी करावी, ग्रामवेक पदाचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी, शैक्षणिक अर्हता कोणत्याची शाखेची करणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९८५चे कलम ४९चे नियमात सर्व जिल्हा परिषदांच्या प्राप्त अहवालानुसार सुधारणा करावी, विस्तार अधिकारी पदाची संख्या वाढवावी, प्रशासनात दिरंगाईमुळे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्ती दिलेले मात्र १ नोव्हेंबर २००५ पूर्वी भरतीप्रक्रिया चालू झालेल्या ग्रामसेवकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक भरती बंद करावी, शिक्षकांप्रमाणे ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधित्व मिळावे आदी मागण्याचा समावेश आहे.