साडेआठशे ग्रामपंचायती मालामाल; वित्त आयोगाचे ३१ कोटी मिळाले
By जितेंद्र दखने | Published: October 16, 2023 05:49 PM2023-10-16T17:49:17+5:302023-10-16T17:52:04+5:30
ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा बंधित निधी
अमरावती : केंद्र व राज्य सरकारने पंधराव्या वित्त आयोगाचा बंधित निधीचा हप्ता वितरित केला आहे. त्यामुळे जिल्ह्याला या आयोगाचा आणखी ३१ कोटी ११ लाख १२ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे.
पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना ८० टक्के तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी दहा टक्क्यांप्रमाणे रक्कम विकास कामासाठी मिळते. दीड वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक असल्याने एकही रुपयाचा निधी मिळालेला नाही. फक्त ग्रामपंचायतींना निधी मिळाल्याने त्या मालामाल झाले आहेत.
जिल्ह्यात ८४१ ग्रामपंचायत असून वित्त आयोगाच्या निधीचे ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणे अनुदान दिले जाते. एखादा गावाची लोकसंख्या दहा हजार असेल तर वर्षाला त्या गावाला एक कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळते. आतापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीचे ग्रामपंचायत कोट्यवधी रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातील ३१ कोटी ६० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला आहे. आता लोकसंख्येनुसार त्याचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
केवळ तीन पंचायत समितीला निधी
जिल्हाभरात १४ पंचायत समिती कार्यरत आहेत.यापैकी ११ पंचायत समितीमध्ये सध्या प्रशासक आहेत. त्यामुळे चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि तिवसा या तीन पंचायत समित्यांना पंधराव्या वित्त आयोगाचा सुमारे ६ कोटी ०४ लाख ४० हजारांचा निधी मिळाला आहेत.