पाणीटंचाईसाठी ७९७ गावांत ८५२ उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:05 AM2021-05-04T04:05:30+5:302021-05-04T04:05:30+5:30
अमरावती : उन्हाळा लक्षात घेता पाण्याची उपलब्धता असावी, यासाठी प्रस्तावित व मंजूर कामांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ...
अमरावती : उन्हाळा लक्षात घेता पाण्याची उपलब्धता असावी, यासाठी प्रस्तावित व मंजूर कामांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी दिले आहेत.
पाणीटंचाई आराखड्यानुसार ७९७ गावांत ८५२ उपाययोजनांसाठी १३ कोटी १५ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १५९ गावांतील १६३ योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात २९ गावांत १५ विंधनविहिरी व १८ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३, भातकुली तालुक्यात १, मोर्शी तालुक्यात विंधनविहिरी व खासगी विहिरी मिळून सहा, वरूड तालुक्यात एक, चांदूर रेल्वे तालुक्यात ७, अचलपूर तालुक्यात ८ बोअरवेल व एक खासगी विहीर, चिखलदरा तालुक्यात ६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
टंचाई आराखड्यात विंधनविहीर, कूपनलिका घेणे, नळयोजनांची, विंधनविहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकरने पाणी पुरवठा, खासगी विहीर अधिग्रहण व प्रगतिपथावरील ३६ नळयोजना पूर्ण करणे असा ७९७ गावांसाठी १३ कोटी १५ लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्यातील १६३ उपाययोजनांसाठी ५ कोटी ९० लक्ष निधी मंजूर आहे. सद्यस्थितीत ९४ गावांत उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी २ कोटी ३ लक्ष खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीची ७२ कामे प्रस्तावित असून, त्यासाठी १ कोटी ८७ लाख रुपये, तर मंजूर ६५ कामांसाठी ३ कोटी ७८ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे.
बॉक्स
सहा गावांत टँकरने पाणी पुरवठा
सद्यस्थितीत टँकरने होणाऱ्या पाणी पुरवठ्यात चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, लवादा, आकी, सोमारखेडा, मलकापूर व चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुरे या सहा गावांचा समावेश आहे. एप्रिल पश्चात भूजलात कमी येत असल्याने अनेक गावांतील जलस्रोत कोरडे पडत असल्याने महिनाअखेर टँकरची संख्यावाढ होणार आहे.