‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ८५८ लहान मुलांची आई-वडिलांशी पुर्नभेट
By गणेश वासनिक | Published: December 23, 2023 01:35 PM2023-12-23T13:35:45+5:302023-12-23T13:35:54+5:30
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचा यशस्वी पुढाकार, एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम
अमरावती : मध्य रेल्वे विभागाचे रेल्वे स्थानक परिसर, प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलिस आणि इतर अग्रभागी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या आठ महिन्याच्या कालावधीत ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ८५८ लहान मुलांची सुटका केली आहे. यात ५९१ मुले आणि २६७ मुलींचा समावेश असलेल्या आणि 'चाइल्डलाइन' या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आणली आणि त्यांना स्वाधीन केले आहे. मुंबई रेल्वे विभागाने सर्वाधिक म्हणजे २५२ बालकांची सुटका केली.
रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत लहान मुलांना गैरप्रकारांपासून वाचवण्याची जबाबदारीही ते योग्य पध्दतीने पार पाडत आहे. काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे अथवा उच्च चांगल्या जीवन पध्दती किंवा शहराचे ग्लॅमर आदींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांच्या निदर्शनास येत असतात. हे प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात आणि त्यांच्या समस्या समजून घेतात. त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा भेटण्याचा सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतात.
रेल्वेचा ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य ठरत आहे. घरून विविध कारणांनी बाहेर पडणाऱ्या लहान मुलांचे योग्य पद्धतीने समुपदेशन, मार्गदर्शन केले जाते. आई-वडिलांचे मुलांच्या जीवनात महत्वाचे स्थान आणि माहिती देेऊन त्यांचे मन परिवर्तन करुन लहान मुलांना पालकांना स्वाधीन केले जाते. या माेहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, मुंबई