महापालिका क्षेत्रात खासगी भागीदारीतून ८६० घरकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:23 PM2019-01-16T22:23:36+5:302019-01-16T22:24:03+5:30
सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात घरांची निर्मिती केली जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ८६० घरांच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राने पूर्वीच मान्यता दिली. यासाठी शहरातील १९ हजार ५२९ नागरिकांनी आॅनलाईन अर्ज केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात घरांची निर्मिती केली जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ८६० घरांच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राने पूर्वीच मान्यता दिली. यासाठी शहरातील १९ हजार ५२९ नागरिकांनी आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी ६८७ लाभार्थ्यांकडून डीडीच्या स्वरूपात प्रती ४९ हजारांची अमानत रक्कम महापालिकेद्वारा जमा करण्यात आलेली आहे.
गृहनिर्माण विभागाच्या निर्देशाप्रमाणे ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेत चार घटक अंतर्भूत केलेले आहे. यात शहरी भागाकरिता महापालिका ही अंमलबजावणी यंत्रणा आहे. यामध्ये चार घटकांत २०२१-२२ दरम्यान २४ हजार ८१० घरकुलांची निर्मिती केली जाईल. यात घटक क्रमांक तीनमध्ये खासगी भागीदारीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी ८६० घरकुलांच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिल्याने तीन दिवसांपूर्वीच या योजनेचे भूमीपूजन करण्यात आले. या घटकांतर्गत लाभार्थ्यांना शासनाचे अडीच लाखांचे अनुदान व ३० चौरस मीटर चटईक्षेत्र राहील. महापालिका हद्दीत बडनेरा, बेलोरा, निंबोरा, नवसारी तारखेडा, म्हसला व रहाटगाव येथील भूखंडाची निवड झालेली आहे.
या घटकात सदनिकेची किंमत नऊ लाखांपर्यंत अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना सहा लाखांचा हिस्सा प्राप्त करण्यासाठी महापालिकेद्वारा बँकांशी समन्वय साधला जात आहे व या योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबवून विकासकासोबत १२ डिसेंबरला करारनामा करण्यात आल्याची माहिती उपअभियंता सुनील चौधरी यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. या आठवड्यात भूमीपूजन झालेल्या ८६० घरकुलांचे बांधकाम आॅक्टोबर २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.