एक लाख शेतकऱ्यांना ८७ कोटींचा विमा
By admin | Published: June 8, 2016 12:00 AM2016-06-08T00:00:04+5:302016-06-08T00:00:04+5:30
कमी पावसामुळे उद्भवणारा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळ यापासून पिकांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी, ...
४६ हजार शेतकरी वंचित : सोयाबीन, मूग, उडदाला भरपाई, कपाशीला ठेंगा
गजानन मोहोड अमरावती
कमी पावसामुळे उद्भवणारा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळ यापासून पिकांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी मागील वर्षीच्या खरीप हंगामात राष्ट्रीय पीकविमा योजना राबविण्यात आली. यामध्ये १ लाख ४९ हजार ४९२ शेतकऱ्यांनी १ लाख ४१ लाख ७९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी २८ कोटी ९ लाखांच्या रकमेचा भरणा केला होता. यापैकी १ लाख २ हजार ९०५ शेतकऱ्यांना ८७ कोटी ४७ लाख ४८ हजारांचा पीक विमा मंजूर झाला असून लवकरच ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना ही रबी १९९९-२००० या हंगामापासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भारतीय कृषी विमाकंपनीच्या सहकार्याने राज्यातील अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येते. मागील वर्षीच्या खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, उडिद, तूर, मूग, भूईमुग, तीळ, सोयाबीन, सूर्यफुले, कापूस व कांदा या पिकांसाठी ही पीकविमा योजना राबविण्यात आली. यामध्ये अमरावती उपविभागातील अमरावती, भातकुली, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ६८ हजार ५४७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. ५९ हजार ९१९ हेक्टरमधील पिके संरक्षित केली.
शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार रक्कम
अमरावती : यासाठी ११२ कोटी ७ लाख ८३ हजारांची रककम संरक्षित करण्यात आली होती. यासाठी ५ कोटी ८० लाख १९ हजाराचा एकूण विमा हप्ता भरण्यात आला. प्रत्यक्षात या उपविभातील ५४ हजार ५६० शेतकऱ्यांना ५२ कोटी २६ लाख २८ हजारांचा विमा मंजूर करण्यात आला आहे.
मोर्शी उपविभागातील वरुड, तिवसा, मोर्शी व चांदूरबाजार तालुक्याधील २९ हजार ७७२ शेतकऱ्यांनी २८ हजार १५४ हेक्टरचा विमा काढून ५४ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम संरक्षित केली होती. यासाठी १४ कोटी ५३ लाख १३ हजारांचा विमा हप्त्याचा भरणा केला होता. प्रत्यक्षात २२ हजार ६११ शेतकऱ्यांना १३ कोटी १५ लाख ७५ हजाराची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
अचलपूर उपविभागातील अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, धारणी व चिखलदरा तालुक्यातील ५१ हजार ४७३ शेतकऱ्यांनी ५३ हजार ३ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढला होता. यासाठी ७ कोटी ७५ लाख ८१ हजारांचा हप्ता भरणा केला होता. प्रत्यक्षात २५ हजार ७३४ शेतकऱ्यांना २२ कोटी ५ लाख ४५ हजाराची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. २२ कोटी ५ लाख ४५ हजाराची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे.
नांदगाव तालुक्यात सर्वाधिक २५ हजार शेतकऱ्यांचा विमा
जिल्ह्यात १ लाख ४९ हजार ७९२ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. यामध्ये सर्वाधिक २५,८०० शेतकऱ्यांचा सहभाग नांदगाव तालुक्यात होता. अमरावती १०,६१०, भातकुली ११८०२, चांदूररेल्वे ९५६०, धामणगाव १०७७५, वरुड ३७३०, तिवसा ८७६२, मोर्शी ७२९०, चांदूरबाजार ९,९९०, अचलपूर ८८०१, अंजनगाव १२२७३, दर्यापूर २३४४३, धारणी ६०३८ व चिखलदरा तालुक्यात ९१८ शेतकरी या योजनेत सहभागी होते.
कापसाला भरपाई मिळालीच नाही
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशी पिकाचा विमा काढला होता. यापैकी मंडळस्तरावर सोयाबीनची भरपाई देण्यात आली. मात्र, कपाशीसाठी केवळ २ मंडळात भरपाई मिळाली. बाकी क्षेत्राला ठेंगा दाखविण्यात आला. चिखलदरा तालुक्यामधील टेंभ्रूसोंडा मंडळात १९ शेतकऱ्यांच्या २१ हेक्टरमध्ये ४७७८ रुपये हेक्टर भरपाई मिळणार आहे. दर्यापूर तालुक्यातील मंडळग्राम तीर्थ येथे २४६ शेतकऱ्यांना ३१३ हेक्टरसाठी १०५३ रुपये हेक्टरप्रमाणे पिकांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
जोखीम स्तराबाबत शेतकरी अनभिज्ञ
राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी जोखीम स्तर महत्त्वाचा आहे. बहुतांश शेतकऱ्यांना जोखीम स्तर माहिती नसल्याने मदतीच्या रकमेत तफावत राहाते. आता शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली. यासाठी शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देण्याची गरज आहे.
नांदगाव तालुक्यात सर्वाधिक २० कोटींची भरपाई
मागील खरीप हंगामासाठी जिल्ह्यात८७ कोटींची नुकसान भरपाई मिळणार आहे. यापैकी सर्वाधिक २० कोटी ५ लाखांची भरपाई नांदगाव खंडेश्वर तालुक्याला मिळणार आहे. येथील २३ हजार ७८१ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. चिखलदऱ्यात अत्यल्प ६५० शेतकऱ्यांचा सहभाग होता. तेथे ५६ लाखांची तर सर्वात कमी ४३ लाखांची भरपाई वरुड तालुक्यात मिळणार आहे.
दर्यापूर तालुक्यामधील १३ हजार शेतकरी वंचित
या पीकविम्यासाठी जिल्ह्यात ४६ हजार ८८७ शेतकरी वंचित राहिले. यापैकी सर्वाधिक १३ हजार ४३ शेतकरी दर्यापूर तालुक्यातील आहेत. अमरावती तालुक्यातील ३३००, भातकुली १०९६, चांदूररेल्वे ४१२४, धामणगाव ३४४८, नांदगाव २०१९, वरुड २५५९, तिवसा १८९९, मोर्शी १९३९, चांदूरबाजार ७५४, अचलपूर १३१०, अंजनगाव ६७६९, धारणी ३०८८ व चिखलदरा तालुक्यातील ७६८ शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत.