बायोमेट्रिक रेशनसाठी ८७ टक्के आधार सिडिंग, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ८९ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 06:47 PM2017-11-14T18:47:14+5:302017-11-14T18:48:34+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभाग रेशन कार्डची माहिती संगणकीकृत करीत आहे, तसेच ते आधार कार्र्डशी लिंक केले जात आहे. विभागात सद्यस्थितीत हे काम ८७ टक्के झाले आहे.
अमरावती : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभाग रेशन कार्डची माहिती संगणकीकृत करीत आहे, तसेच ते आधार कार्र्डशी लिंक केले जात आहे. विभागात सद्यस्थितीत हे काम ८७ टक्के झाले आहे. सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात ८९ टक्के सिडिंग झाले आहे. त्यानंतर नागरिकांची आधार ओळख पटवून रेशन मिळणार आहे.
सर्वाजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अस्तित्वातील शिधापत्रिकांच्या आधारे कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक शिधापत्रिकेशी लिंक करण्याची प्रक्रिया सध्या पुरवठा विभागात सुरू आहे. यासाठीचे अर्ज रास्त भाव दुकानात नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट शिधापत्रिकांना आळा बसून वितरण व्यवस्थेमधील त्रुटी निकाली निघणार आहे तसेच बायोमेट्रिक रेशनमुळे नागरिकांना नियमित स्वरूपात धान्य मिळणार आहे.
योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ८२ हजार ९२३ शिधापत्रिकांवरील १९ लाख ३१ हजार २८९ सदस्यांपैकी १७ लाख २० हजार ४८१ सदस्यांचे आधार क्रमांक संलग्न करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात १८ लाख ८ हजार ७३६ सदस्यांकडे ३ लाख ८१ हजार १५१ शिधापत्रिका आहेत. यापैकी १५ लाख ८४ हजार ९१२ लाभार्थींचे सिडिंग पूर्ण झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार १४८ शिधापत्रिका व १८ लाख २४ हजार २८१ सदस्यसंख्या आहे. यापैकी १६ लाख ९ हजार ७२० सदस्यांचे आधार क्रमांक सिडिंग करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात २ लाख १४ हजार ८६५ शिधापत्रिकांपैकी ९ लाख ४४ हजार ५८३ सदस्यांची नोंदणी झाली, तर वाशिम जिल्ह्यात ६ लाख ७१ हजार ८७९ सदस्यांच्या १ लाख ५१ हजार ५७७ शिधापत्रिकांवरील ८६ टक्के आधार सिडिंग पूर्ण झाले आहे. यामध्ये ५ लाख ७८ हजार ७८ हजार ४९७ सदस्यांची आधार नोंदणी आहे.
अन्न सुरक्षा योजनेसाठीही ८७ टक्के सिडिंग
शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकºयांना सवलतीच्या दरात रेशन पुरवठा करण्यात येतो. अमरावती विभागात अन्न सुरक्षा योजनेत १४ लाख ९१ हजार ६६४ शिधापत्रिका आहेत. यामध्ये ७३ लाख ७४ हजार १२४ लाभार्थी आहेत. ८७.३१ टक्के म्हणजेच ६४ लाख ३८ हजार १९३ लाभार्थ्याचे आधार सिडिंग करण्यात आले. उर्वरित ९ लाख ३५ हजार ९३१ लाभार्थींचे संलग्नीकरण अद्याप व्हायचे आहे.