८८ संक्रमित रुग्ण गंभीर परिस्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:04+5:302021-02-12T04:13:04+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढला आहे. सद्यस्थितीत ७७८ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी ८८ रुग्ण गंभीर परिस्थितीत ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढला आहे. सद्यस्थितीत ७७८ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी ८८ रुग्ण गंभीर परिस्थितीत असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.
दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागलेली आहे. तसे पाहता जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दहा महिन्यांपासून आहे. या कालावधीत एक लाख ९९ हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी १,९८,२३१ जणांना क्वारंटाईन जागेत ठेवण्यात आलेले आहे. यापैकी १,९०११८ जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांना मुक्त करण्यात आले असले तरी सद्यस्थितीत ७,८१२ व्यक्ती अजूनही विलगीकरणात असल्याचा जिल्हा शल्य चिकित्सकांचा अहवाल आहे.
आरोग्य यंत्रणेद्वारा आतापर्यंत १० फेब्रुवारीपर्यंत १,८७,६७२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहे. त्यापैकी १,६३,०८९ निगेटिव्ह आलेले आहे तर २३,८३५ पॉझिटिह अहवाल आहेत. सद्यस्थितीत ६८८ रुग्ण साधारण परिस्थितीत आहेत व ८८ गंभीर स्थितीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २२,६३० रुग्णांना कोरोना संक्रमणमुक्त करण्यात आले. हे प्रमाण एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत ९५ टक्के असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
बॉक्स :
विद्यापीठ लॅबद्वारा ८७, ३५४ नमुन्यांची तपासणी
या दहा महिन्यांच्या कालावधीत अमरावती विद्यापीठाचे विषाणू परिक्षण प्रयोगशाळेद्वारा ८७,३५४ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये १२,५७० नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. पीडीएमसीद्वारा ५,४२२ नमुन्यांच्या तपासणीपैकी १,७१६ व खासगी लॅबचे ६,४६२ पैकी १,८६९ नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
बॉक्स :
जिल्ह्यात ३,१२० बेडची उपलब्धी
जिल्ह्यात सद्यस्थितीत ३,१२० बेडची उपलब्धी आहे. यामध्ये १४ कोरोना हॉस्पिटलमध्ये ७९७, ६ डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमध्ये ३५१, याशिवाय २१ डेडिकेटेड कोरोना केअर सेंटरमध्ये १९७२ बेडची उपलब्धी आहे. याशिवाय औषधांचा साठा पुरेसा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णसंख्या वाढ असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.