८८ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: April 13, 2017 12:10 AM2017-04-13T00:10:32+5:302017-04-13T00:10:32+5:30
बारदाना उपलब्ध नाही आदी क्षुल्लक कारणांनी जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्र सातत्याने बंद ठेवल्या जाते.
मंदगतीचा परिणाम : नाफेड संलग्नित यंत्रणांचा ढिसाळ कारभार
अमरावती : बारदाना उपलब्ध नाही आदी क्षुल्लक कारणांनी जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्र सातत्याने बंद ठेवल्या जाते. त्यामुळे जिल्ह्यातील दहा केंद्रांवर मंगळवारपर्यंत ८७ हजार ५०० क्विंटल तूर मोजणीसाठी बाकी आहे. यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना नाहक फटका बसत आहे.
सद्यस्थितीत चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर व मोर्शी तालुक्यात व्हिसीएमएफ व नाफेड तसेच अमरावती व धामणगाव येथे एफसीआय तसेच अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार दर्यापूर व वरुड येथे डिएमओद्वारा शासकीय तूर खरेदी डिसेंबरच्या अखेरीस करण्यात आली. आतापर्यंत या केंद्रावर २.६२ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची १३१.७ कोटी एवढी रक्कम आहे. अद्यापही काही केंद्रांवर १५ ते २० दिवसांचे चुकारे करणे बाकी आहे. एफसीआयचे अमरावती व धामणगाव येथील केंद्र बारदान्याअभावी बंद आहे. धामणगाव बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी बारदाना उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली असताना एफसीआयद्वारा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. मात्र भंडारा येथून एक लाख बारदाना मागविण्यात आला. यापैकी ३० हजार बारदाना एफसीआयला भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर येथील शासकीय खरेदी केंद्रावर तुरीची मोजणी सुरु होणार आहे. (प्रतिनिधी)
अशी आहे केंद्रनिहाय तूर मोजणी बाकी
जिल्ह्यात सद्यस्थितीत ८७ हजार ५०० क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये चांदूररेल्वे चार हजार क्विंटल, नांदगाव २५०० क्विंटल, मोर्शी ८ हजार क्विंटल, अमरावती २० हजार क्विंटल, धामणगाव १० हजार क्विंटल, अचलपूर ९ हजार क्विंटल, अंजनगाव सुर्जी ७५०० क्विंटल, चांदूरबाजार ३५०० क्विंटल, दर्यापूर १७ हजार क्विंटल व वरुड येथील केंद्रांवर सहा हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.
शेतकऱ्यांना नाहक त्रास
बारदाना नाही, गोदाम नाही आदी कारणे दाखवून अचानकपणे तूर खरेदी बंद केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना माल मोजणीसाठी पडून आहे. तूर मोजणीदेखील मंदगतीने होत असल्याने शेतकऱ्यांचा नाहक ताटकडत बसावे लागते व तूर मोजणीपर्यंत मालाची जबाबदारी ही शेतकऱ्यांची असल्याने तूर चोरीस व वजन घटने याचा फटका शेतकऱ्यांनाच बसतो