मतदार यादीतील ८८ हजार नावे छायाचित्रांविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:14+5:302021-06-16T04:16:14+5:30
अमरावती : मतदार यादीत अद्यापही छायाचित्र ‘अपडेट’ नसलेल्या ९१ हजार १८७ मतदारांपैकी केवळ ३ हजार ७३ छायाचित्रे ...
अमरावती : मतदार यादीत अद्यापही छायाचित्र ‘अपडेट’ नसलेल्या ९१ हजार १८७ मतदारांपैकी केवळ ३ हजार ७३ छायाचित्रे जमा झाली. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून गृहभेटी दिल्यानंतर अनेक मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे आढळले आहे. सद्यस्थितीत असे ८८ हजारांवर मतदार आहेत. १९ जूनपर्यंत ‘नो फोटो व्होटर्स’ची छायाचित्रे जमा न झाल्यास ती नावे वगळण्यात येतील, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी स्पष्ट केले.
छायाचित्रासह मतदार यादी अद्ययावत करण्याचे कार्य जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून होत आहे. हे राष्ट्रीय कार्य असल्यामुळे संबंधित मतदारांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. यादीत ९१ हजार १८७ ‘नो फोटो व्होटर्स’ आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मोहिमेत त्यातील ५ हजार ८५३ मतदारांचा शोध लागून ३ हजार ७३ छायाचित्रे जमा झाली. उर्वरित २ हजार ७८० मतदारांनी अद्यापही छायाचित्रे दिलेली नाहीत.
मतदार यादीत ज्या मतदारांची छायाचित्रे समाविष्ट नसतील, अशा मतदारांची यादी जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा मतदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून पडताळणीही होत आहे. त्यामुळे यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी १९ जूनपूर्वी आपली छायाचित्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालय किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बॉक्स
पत्त्यावर न आढळणाऱ्यांबाबत पंचनामेही सुरू
मतदार याद्या अद्ययावत होत आहेत. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीही देतात. मात्र, अनेकदा मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत पंचनामे करून अशा मतदारांची नावे लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी अधिनियम १९६० मधील तरतूद व भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वगळण्यात येणार आहेत.