शिवपरिवारातील ८९९ सदस्यांनी बजावला हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 09:45 PM2017-09-14T21:45:16+5:302017-09-14T21:46:25+5:30
शिक्षणक्षेत्रात राज्यात अग्रणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळासाठी गुरूवारी १,०३८ पैकी ८९९ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षणक्षेत्रात राज्यात अग्रणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळासाठी गुरूवारी १,०३८ पैकी ८९९ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ८६.६० इतकी आहे. एकूण ४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अनेक कारणांनी बहुचर्चित ठरलेल्या निवडणुकीचे मतदान खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. सत्तरी ओलांडलेल्या सभासदांनी देखील मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभाग घेतला, हे येथे उल्लेखनीय.
गुरूवारी सकाळी ८ ते सांयकाळी ५ दरम्यान श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील पाच मतदानकेंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच शिवपरिवारातील स्रेहीजन व रिंगणातील चारही पॅनेलशी संबंधित उमेदवारांच्या चाहत्यांच्या गर्दीने पंचवटी चौक फुलला होता. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी चारही पॅनेलसह अपक्ष उमेदवारांनी नियोजन केल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. अनेक वयोवृद्ध त्यांच्या नातवंडांसह उत्साहाने मतदानाला आले होते. संस्थेत एकूण १,०३६ आजीवन सभासद आहेत. यापैकी ९० सभासद हे कंपनीचे प्रतिनिधी आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत २५७ तर दुपारी एक वाजता ५६०, तीन वाजता ८०५ तर ५ वाजेपर्यंत ८९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतपेट्या गोळ्या केल्यानंतर रात्री ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. उशिरा रात्रीपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहिल. सर्वप्रथम चार सदस्यपदांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. वृत्तलिहेस्तोवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.सी पाठक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सी.व्ही देव व निवडणूक कक्ष अधिकारी म्हणून संस्थेचे अधीक्षक दिनेश बागुल यांनी काम पाहिले.
रात्री ११ नंतर येणार पहिला निकाल
गुरूवारी रात्री ८ नंतर मतमोजणीला सुरूवात होणार आहे. यावेळी प्रथम पेट्यामधील मतपत्रिका एकत्र करून सदस्य, उपाध्यक्ष,कोषाध्यक्ष व अध्यक्ष याक्रमाने ५० चा गठ्ठा तयार करण्यात येणार आहे . ५ टेबलवर मतमोजणी होणार आहे. व याच क्रमाने ही मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे .त्यानुसार रात्री ११ नंतर पहिला सदस्यपदासाठींचा निकाल बाहेर येणार असल्याचे निवडणूक अधिकाºयांनी सांगितले.
प्रथमच तरूणाईचा उत्साह
यावेळी निवडणूक रिंगणातील चार पॅनेलमध्ये बºयाच तरूणांना संधी दिली गेली. त्यामुळे त्यांचे सहकारी व स्रेहीजनांचा उस्फूर्त उत्साह यावेळी शिवपरिवाराने अनुभवला .अगदी सहजगत्या कोणतेही काम करण्याची त्यांच्या सहजप्रवृतीबाबत कौतुकाचे उद्गार यावेळी ऐकावयास मिळाले.
मतदान केंद्रापर्यंत वाहनाची मुभा
शिवपरिवारातील अनेक जेष्ठ सभासदांनी सत्तरी पार केली आहे. यापैकी काहींची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना रुग्णवाहिक ा अन्य वाहनांद्वारे मतदान केंद्रांपर्यत जाण्याची मुभा होती. व त्यांना मतदान करण्यास त्यांच्या निकटतम नातेवाईकांचे सहकार्य घेण्यास परवानगी असल्यामुळे नातवंडासह येऊन अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला.
अमरावती, अकोलेकरांची अधिक गर्दी
शिवपरिवारातील आजीवन सभासद राज्यात विखुरले असले तरी अमरावती व अकोला जिल्ह्यात अधिक आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील चाहत्यांची मोठी गर्दी होती. अधिकाधिक सभासद चारचाकी वाहनांनी आल्यामुळे शेकडो वाहनांची देखील गर्दी होती. भाऊसाहेबांवर प्रेम करणारा मोठा वर्ग असल्याने यावेळी कौल कुणाला ? हे जाणून घेण्यासाठी अनेक जिल्ह्यातून शिवपरिवाराचे चाहते आले आहेत.
सर्वच बुथ आमनेसामने
या निवडणुकीसाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वच पॅनेलद्वारा बुथ लावण्यात आले. या ठिकाणी अपक्षांसह सर्वच पॅनेलचे हितचिंतक, आप्तस्वकीय व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहून परस्परांशी हास्यविनोद करीत होते.