बिस्मिल्लानगरातील ९५ अवैध नळजोडण्या तोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:50 PM2018-08-01T22:50:31+5:302018-08-01T22:52:44+5:30
शहरातील बिस्मिल्लानगर, लालखडी आदी भागातील ९५ अवैध नळ जोडण्या बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पथकाने खंडित केल्या. ३१ जुलैपासून ही धडक मोहीम हाती घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील बिस्मिल्लानगर, लालखडी आदी भागातील ९५ अवैध नळ जोडण्या बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पथकाने खंडित केल्या. ३१ जुलैपासून ही धडक मोहीम हाती घेण्यात आली.
मजीप्राच्या टाकीतून महाजनपुरा, ताजनगर, अलीमनगर, कमेला ग्राऊंड, छायानगर, जाकीर कॉलनी, गुलिस्ता नगर, यास्मिननगर, बिस्मिल्लानगर, लालखेडी, नूरनगर, हबीबनगर, अन्सारनगर आदी भागांतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या परिसरातील काही जण अवैध नळजोडणी घेऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे निदर्शनात आले. साधारणपणे ६० टक्के नागरिकांकडून मोटरपंप लावून पाणी खेचण्याचा प्रकार केला जात असल्याने इतरांना योग्य दाबाने पाणीपुरवठा करणे मजीप्रासाठी कठीण बाब झाली आहे.
पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने मजीप्राला वैध जोडणीधारकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील अवैध नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम ३१ जुलैपासून हाती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान बिस्मिल्लानगरात ९५ जोडण्या खंडित करण्यात आल्या. कारवाईत अडथळा आणणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता वसंत मस्करे यांनी दिली.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे कसरत
अपुरे मनुष्यबळ, नळजोडणी असणारे बहुतांश रस्ते काँक्रीटचे असणे, अवैध नळजोडणी असणाऱ्या नागरिकांची कर्मचाºयांप्रति आक्रमक वृत्ती या सर्व प्रकारांमध्ये मजीप्राला अवैध नळजोडण्या तोडताना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील नागरिक व नगरसेवकांच्या सहकार्याशिवाय पाणीपुरवठ्यामध्ये सातत्य व समतोल राखणे अशक्य आहे. नागरिकांमध्येदेखील स्वंयशिस्त महत्त्वाची आहे.
सहा हजारांवर अवैध जोडण्या
लालखडी परिसरात किमान सहा हजार अवैध नळजोडण्या असल्याचा मजीप्राचा अंदाज आहे. मागील वर्षी याविषयीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आता ३१ जुलैपासून धडक मोहीम हाती घेण्यात आली व एका दिवसात ९० अवैध नळजोडण्या खंडित केल्या. सामाजिक संघटनांनी या कामी सहकार्य करून नागरिकांमध्ये जागृती करण्याचे आवाहन मजीप्राने केले आहे.
मंगळवारपासून अवैध नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम मजीप्राने हाती घेतली. एका दिवसात ९५ नळजोडण्या खंडित केल्या आहेत. ही मोहीम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे.
- संजय लेवरकर
सहायक अभियंता, मजीप्रा