प्रकल्प डीपीआरसाठी ९ आॅक्टोबरची डेडलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:38 PM2017-09-11T23:38:44+5:302017-09-11T23:39:05+5:30
बहुप्रतिक्षित आणि महापालिकेसाठी अनिवार्य असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुप्रतिक्षित आणि महापालिकेसाठी अनिवार्य असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) बनविण्यासाठी आयुक्तांनी ९ आॅक्टोबरची 'डेडलाईन' अधिनस्थ यंत्रणेला दिली. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ आणि स्वच्छ भारत अभियानात गुणांकन मिळविण्यासह अमरावतीकर व सुकळीवासीयांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी या प्रकल्पाची उभारणी महापालिकेला बंधनकारक आहे. महेश देशमुख यांच्याएवजी या प्रकल्पाचे आव्हान आता वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांना पेलायचे आहे.
त्यापार्श्वभूमिवर प्रकल्प उभारणीसाठी आयुक्त हेमंत पवार यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. कोअर प्रोजेक्टने प्रकल्प उभारणीतून माघार घेतल्यानंतर आयुक्त हतबल झाले होते.मात्र आता सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी त्यांना सहकार्याचे बळ दिल्याने या प्रकल्पाचा प्रवास नव्याने सुरू झाला आहे. यासाठी आधी डीपीआर बनविणे क्रमप्राप्त आहे. त्या अनुषंगाने शहरातील घनकचरा संकलन, वर्गीकरण व व्यवस्थापन यासंदर्भात विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) बनविण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी पाच सदस्यीय समिती नेमली आहे. डीपीआर बनविण्यासाठी राज्यशासनाने ज्या कन्सल्टंसीची नेमणूक केली आहे. त्या कन्सल्टंसीच्या माध्यमातून डीपीआर तयार करून घेण्याची जबाबदारी या समितीकडे सोपविण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे हे समितीप्रमुख आहेत. या समितीने कन्सल्टंटद्वारे डीपीआर शक्य तितक्या लवकर तयात करुन किमान ९ आॅक्टोबरपर्यंत आपल्याकडे सादर करावा,असे आदेश आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी ११ सप्टेंबरला जारी केले आहेत.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी सदस्य सचिव
या प्रकल्पाची धुरा नव्याने वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याकडे सोपविली आहे. डीपीआर तयार करून घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेत नेमण्यात आलेल्या समितीच्या त्या सदस्य सचिव आहेत. त्यांच्याशिवाय या समितीत प्रभारी उपायुक्तद्वय नरेंद्र वानखडे व महेश देशमुख आणि सहायक वैद्यकीय आरोम्य अधिकारी अजय जाधव हे सदस्य आहेत.