शहरात ९० टक्के गणपती प्लास्टर आॅफ पॅरिसचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:04 PM2018-09-08T22:04:32+5:302018-09-08T22:05:00+5:30
पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू असताना, अमरावती शहरात आजही ९० टक्के प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचीच स्थापना होणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पर्यावरणपूरक गणेशाकडे नागरिकांचा ओढा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जनजागृतीचा अभाव असल्यामुळे अद्याप प्लास्टर आॅफ पॅरिसच्या बंदीची अंमलबजावणीवर विशेष लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे.
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू असताना, अमरावती शहरात आजही ९० टक्के प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचीच स्थापना होणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पर्यावरणपूरक गणेशाकडे नागरिकांचा ओढा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जनजागृतीचा अभाव असल्यामुळे अद्याप प्लास्टर आॅफ पॅरिसच्या बंदीची अंमलबजावणीवर विशेष लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे.
घराघरांत विराजमान होणाऱ्या गणपती बाप्पांच्या आगमनाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. १३ सप्टेंबर रोजी गणेश स्थापना असल्यामुळे भाविकसुद्धा जय्यत तयारीला लागले आहेत. अमरावती शहरात छोटे-मोठे असे एकूण दोनशेंवर गणेश मूर्तिकार आहेत. सद्यस्थितीत सर्व मूर्तिकार गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहे. महिन्याभरापूर्वी गणेशमूर्तींचे बूकिंग अनेकांनी केले आहे. मात्र, पर्यावरणपूरक गणेश स्थापनेचा विचारसुद्धा अनेकांनी केला नाही. गणेशमूर्तींचे बूकिंग करताना माती किंवा पीओपीबाबत बहुतांश नागरिक विचारतदेखील नसल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर शहरातील प्रसिद्ध मूर्तिकारांसह छोट्या-मोठ्या मूर्तींचे व्यावसायिकसुद्धा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याला विशेष महत्त्व देत नसल्याचे दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाने याविषयी कोणतीही पूर्वसूचना किंवा माहितीसुद्धा दिली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. मातीचे गणपती तयार करण्यासाठी विलंब लागतो. त्या मूर्तींची फिनिशिंग योग्य येत नाही. ती मूर्ती सुबक होत नाही. मजबूत राहत नाही. रंग योग्य लागत नाहीत आदी कारणे पर्यावरणपूरक गणेशोत्सवात बाधा करीत आहे. शहरात गणेशमूर्तींसोबतच महालक्ष्मी, लक्ष्मी, दुर्गादेवी, पूजन, बैल आदी विविध प्रकार पीओपीनेच बनविले जात आहेत. शहरातील मूर्तिकाराजवळील १०० रुपये ते ५० हजारांपर्यंतच्या मुर्त्या आहेत. पीओपीची मूर्ती स्वस्तात, तर मातीची मूर्ती महाग दरात विक्री केली जात आहे.
पीओपीवर बंदी असताना नियम व कायद्याची अमंलबजावणी केली जात नाही. त्याबाबत स्थानिक स्वराज्य सस्थांंनी जनजागृती करून मूर्तिकारांना नोटीस बजावून पीओपीची मूर्ती तयारच करू नये, असे सांगायला हवे.
- नंदकिशोर गांधी
पर्यावरणतज्ज्ञ
मातीच्या मूर्ती बनविण्यास विलंब लागतो. मेहनत खूप आहे. त्या मूर्ती तुटण्याची भीती अधिक असते. त्यामुळे ९० टक्के मूर्ती पीओपीनेच बनविल्या जाते. पीओपीवर न वापरण्याबाबत आमच्यापर्यंत माहिती कोणीही दिली नाही.
- गजानन सोनसळे
मूर्तिकार, अंबागेट