उदापूर शेतशिवारातून ९० हजारांची मोसंबी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 10:56 PM2017-09-09T22:56:39+5:302017-09-09T22:57:11+5:30
तालुक्यातील उदापूर गावालगतच्या शेतशिवारातील मोसंबीच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी मोसंबी तोडून एका ट्रकमध्ये भरून चोरून नेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : तालुक्यातील उदापूर गावालगतच्या शेतशिवारातील मोसंबीच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी मोसंबी तोडून एका ट्रकमध्ये भरून चोरून नेले. दुसºया वाहनातून मोसंबी नेत असताना पहाटे चार वाजताच्या सुमारास फिरायला जाणाºया युवकांना हा प्रकार लक्षात येताच चोरट्यांनी वाहन सोडून त्यांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यासंदर्भात वरूड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदवून वाहन जप्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील उदापूर शेतशिवारातील गावालगत रमेश संतोष राऊत यांचे मोसंबीचे शेत आहे. शेतात ३०० मोसंबीची झाडे असून यावर्षी चांगले पीक आले आहे. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी शेतात वाहनासह येऊन मोसंबी तोडून एका वाहनातून लंपास केली. एम.एच.३० एबी-३०१८ क्रमांकाच्या दुसºया वाहनात मोसंबी भरून पळून जाण्याच्या तयारीत असताना पहाटे चार वाजताच्या दरम्यान उदापूर येथील काही तरूणांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी शेतमालकाला माहिती दिली असता रमेश राऊत यांनी पोलिसांना कळविले. अंदाजे ३ टन म्हणजे ९० हजार रूपये किंमतीची मोसंबी चोरट्यांनी लंपास केली. यासंदर्भात वरूड पोलिसांनी वाहनासह मोसंबी जप्त केली. ठाणेदार गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश कंठाळे यांनी अज्ञात चोरटयांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध वरूड पोलीस घेत आहेत.