पाच दिवसांत ९२ हजार विद्यार्थ्यांनी भरले ऑनलाईन परीक्षा अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:14 AM2021-02-10T04:14:10+5:302021-02-10T04:14:10+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने यंदापासून सुरू केलेल्या ऑनलाईन परीक्षा अर्जप्रक्रियेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गत पाच ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने यंदापासून सुरू केलेल्या ऑनलाईन परीक्षा अर्जप्रक्रियेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गत पाच दिवसांत ९२ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरल्याची नाेंद परीक्षा विभागाने केली आहे. ही प्रक्रिया १२ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन परीक्षा अर्ज आणि नामांकन हे यंदा विद्यापीठाचे नवीन उपक्रम ठरले आहे. सर्व शाखांच्या अभ्यासक्रमांना असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज भरणे बंधनकारक केले आहे. ऑनलाईन परीक्षा अर्ज कोणत्याही सायबर कॅफेमधून भरता येईल, अशी सहजतेने व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यापीठाने पाेर्टलवर ऑनलाईन परीक्षा अर्ज उपलब्ध केला असून, तो ऑफलाईन अर्ज महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जमा करावा लागणार आहे. पाच-दहा मिनिटांत ऑनलाईन अर्ज विद्यार्थी भरू शकतो, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हिवाळी २०२० परीक्षांसाठी कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, फार्मसी व अन्य पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या १, ३, ५, ७ व ९ अशा विषम सत्राच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षा अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन परीक्षा फाॅर्म विद्यापीठाचे आयसीआरकडून लर्निंग स्पायरलच्या माध्यमातून विद्यापीठाच्या पोर्टलवर उपलब्ध करण्यात आले आहे. विषम सत्राच्या परीक्षार्थींची सुमारे अडीच लाख विद्यार्थी संख्या असून, आतापर्यंत ४० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज केले आहेत.
-------------------
परंपरागत हिरव्या रंगाचा परीक्षा अर्ज आता कालबाह्य झाला आहे. यूजीसीला बदलत्या काळानुसार ऑनलाईन कारभार अपेक्षित आहे. त्यानुसार विविध प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर ऑनलाईन परीक्षा अर्ज व नामांकन या वर्षीपासून सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ. अमरावती विद्यापीठ.