स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी ९२.३० टक्के मतदान
By जितेंद्र दखने | Published: June 23, 2023 06:38 PM2023-06-23T18:38:43+5:302023-06-23T18:38:57+5:30
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी राज्य पातळीवर गेल्या काही दिवसापासून रणधुमाळी सुरू झाली होती.
अमरावती : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २३ जून रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अमरावती विभागात नऊ मतदान केंद्रांवर १७१६ पैकी १५८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. मतदानाची टक्केवारी ९२.३० टक्के आहे.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी राज्य पातळीवर गेल्या काही दिवसापासून रणधुमाळी सुरू झाली होती. बॅकेच्या १९ संचालक मंडळासाठी राज्यभरातून विविध पॅनेलचे तब्बल १४३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे या निवडणूकीसाठी पॅनेलने व उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. बॅकेच्या संचालक पदांसाठी दोन महिला खुला, एक अनुसूचित जाती, एक ओबीसी, एक भटक्या जमाती, तर इतर १४ जागा सर्वसाधारण संवर्गासाठी आहेत.
याप्रमाणे बँकेच्या १९ जागांसाठी १४३ उमेदवार गटाच्या १४ जागांसाठी तब्बर ९८ उमेदवार रिंगणात होते. बँकेसाठी अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे आणि विभागीय कार्यशाळा अशा नऊ मतदान केंद्रांवर विभागातील १ हजार ७१६ पैकी १ हजार ५८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विभागातील ९२.३० टक्के मतदान झाले असून या निवडणुकीची मतमोजणी येत्या २५ जून रोजी मुंबई येथे होणार आहे. निवडणुकीचे झोन अधिकारी म्हणून सहायक निबंधक भालचंद्र पारिसे यांच्या मार्गदर्शनात सुधीर मानकर, राहुल पुरी, चंद्रशेखर पुरी, देवानंद धिरकने, कोल्हे, भिवगडे, गवळी आदींनी निवडणुकीचे कामकाज हाताळले.