अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ९४४ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 07:30 AM2021-09-28T07:30:00+5:302021-09-28T07:30:02+5:30
Amravati News ¯ कृषी ग्राहक वगळून इतर सर्व वर्गवारीतील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ९४४ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
संजय ताकसांडे
अमरावती : कृषी ग्राहक वगळून इतर सर्व वर्गवारीतील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ९४४ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वीज ग्राहकांकडून थकीत वीज बिलाच्या वसुलीशिवाय तरणोपाय नसून तातडीने वसुली करावी, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी दिले. त्यानी सोमवारी ‘प्रकाश सरिता’ सभागृहात अमरावती परिमंडळाच्या आढावा बैठक घेतली.
वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटच्या बिलांची वसुली होणे आवश्यक आहे. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील वीज बिलांची थकबाकी ९४४ कोटींवर गेली आहे. महावितरणवर सद्यस्थितीत वीज बिलांच्या थकबाकीचे मोठे ओझे असल्याने वीजखरेदी, विविध योजनांच्या कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्चांसाठी कर्ज घ्यावे लागत आहे. मात्र त्याचीही मर्यादा आता संपत आलेली आहे. अशा स्थितीत ग्राहकांकडे असलेली संपूर्ण थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही मार्ग, परिस्थितीची वीजग्राहकांना माहिती देण्यात यावी. सोबतच ग्राहक सेवा व वीज बिल वसुलीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. अधिकाऱ्यांकडून कोणताही कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असे ताकसांडे यांनी स्पष्ट केले. बैठकीला मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ६४४ कोटींची थकबाकी
कृषी ग्राहक वगळून इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे अमरावती जिल्ह्यात ३२० कोटी, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये ६४४ कोटी अशी एकूण ९४४ कोटी रुपयांच्या वीज बिलांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे २२१ कोटी, पथदिवे ६१८ कोटी, पाणीपुरवठा योजना ९६ कोटी, तर इतर ग्राहकांकडे आठ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.