९८६.६८ कोटींचा अर्थसंकल्प
By admin | Published: April 1, 2016 12:24 AM2016-04-01T00:24:21+5:302016-04-01T00:24:21+5:30
आठ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात गुरूवारी ९८६.६८ कोटी रूपयांच्या सन २०१६-१७ वर्षाच्या ...
महापालिकेत घमासान : १०१.०४ कोटी शिलकीचे अंदाजपत्रक
अमरावती : आठ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात गुरूवारी ९८६.६८ कोटी रूपयांच्या सन २०१६-१७ वर्षाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सन २०१५-१६ चा सुधारित आणि सन २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक सदस्यांसमोर मांडले. प्रचंड वादंगात या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.
यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्याने बजेटकडे नगरसेवकांसह अमरावतीकरांचे लक्ष लागले होते. कुठलाही नवीन कर न लावता आहे ‘आहे त्या परिस्थितीत’ शासन अनुदान अपेक्षित धरून ‘मागील पानावरून पुढे’ असा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एकूण खर्च होऊनही पालिकेच्या तिजोरीत १०१ कोटी शिल्लक राहणार असल्याचे तरतुदीवरून स्पष्ट होते.
यातून होईल उत्पन्नवाढ
जाहिरात कर, उद्यान उत्पन्न, व्यापारी संकुल, बाजारपेठ व दुकाने यांसह महापालिका स्वनिधीकरिता कर्जउभारणी या लेखाशिर्षांतर्गत स्थायी समितीने महसूल उत्पन्नामध्ये वाढ सुचविली आहे. याखेरीज बांधकाम परवानगी, भूखंडविक्री, मुलभूत सोयी-सुविधा, रस्ते बांधकाम सुधारणेसाठी सुधारित तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
वार्डविकास निधी १० कोटींहून ३० कोटींवर, नगरसेवक निधी २० कोटींहून ३० कोटींवर जेटपॅचर रस्ते सुधारणेसाठी २ कोटी रुपये, दुर्बल/मुस्लिम वस्ती घटकांसाठी १ कोटी, भीमटेकडी सुधारणेसाठी दीड कोटी रुपये, महिला स्वच्छतागृहासाठी ३ कोटी रुपये, महापालिका इमारत बांधकामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज आयुक्तांच्या निवासस्थान बांधकामासह ५० लाख रुपये महसुली खर्च अपेक्षित आहे. ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. महापालिकेचे शासनाकडे मोठ्या प्रमाणावर अनुदान थकीत आहे. यातील काही निधी मार्च २०१७ अखेर प्राप्त होण्याची शक्यता आहे. सन २०१६-१७ मध्ये उर्वरित थकीत अनुदान मिळविण्यासाठी एकत्रित प्रयत्न होण्याची गरज आहे.
- अविनाश मार्डीकर,
सभापती, स्थायी समिती.