जसापूर ग्रामपंचायतीत ९.८९ लाखांचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:16+5:302021-03-22T04:12:16+5:30
जसापूर या गट ग्रामपंचायतीत वडाळा, सरमसपूर, घाटखेडा या गावांचा समावेश आहे. कोरोना काळाच सरपंचांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर निवडणूक रद्द ...
जसापूर या गट ग्रामपंचायतीत वडाळा, सरमसपूर, घाटखेडा या गावांचा समावेश आहे. कोरोना काळाच सरपंचांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर निवडणूक रद्द करून तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान ग्रामसचिव म्हणून जयसिंग चव्हाण, प्रशासक पी.एन. तेलंग होते. त्यांनी १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामसभेची मान्यता न घेता ९ लाख ८९ हजार रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचे कागदोपत्री स्वाक्षरीवरून दिसून येत आहे. मात्र, त्या वस्तू ग्रामपंचायतींच्या कुठल्याच गावात प्रत्यक्ष आणलेल्या नाहीत. मात्र, सचिवाच्या स्वाक्षरीने खरेदी केल्याचे स्पष्ट होत आहे. ही माहिती दीड महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेले सरपंच मंगेश थोरात यांनी प्रत्येक गावात जाऊन पाहणी केली असता, उघड झाली. मात्र, सचिव जयसिंग चव्हाण हे आजारी असल्याने त्यांच्या जागी बरडीया हे काम पाहत असल्याने त्यांना विचारणा केली असता, ही खरेदी प्रशासकांच्या काळात झाल्याने मला माहिती नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, यात कुणाचे हात ओले झाले, याची चौकशी करून संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी अमोल येडगे, गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्याची माहिती सरपंच मंगेश थोरात यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.
बॉक्स
या वस्तूंची केली खरेदी
बिल. नं. १६ मध्ये ९९ हजारांचे कम्प्युटर, सीपीयू, कि-बोर्ड, माऊस, कलर प्रिंटर, लॅपटॉपची खरेदी केली. बिल नं. ५२२ मध्ये एलईडी पथदिवे १९ नग ६५ हजार रुपयांचे खरेदी केल्याचे नमूद आहे. बिल नं. ५१९ मध्ये घरगुती गॅस कनेक्शन तीन नग ४० हजारांत खरेदी केल्याचे नमूद आहे. त्याची दोन नग मिळाले, एकाचा पत्ता नाही.बिल १४ मध्ये ई-लर्निंग सेट एलईडी दीड लाखांत दोन संच खरेदी केले आहे. एक संच गायब आहे. बिल १५ मध्ये अंगणवाडी डेस्क व बेंच ३५ त्याची किंमत १ लाख २० हजारांत खरेदी केले. बिल नं. ५२० मध्ये आयएसआय मार्कचे तीन आरओ मशिनी ६५ हजारांत खरेदी केले. बिल नं. ५२३ मध्ये टाॅय कीट जेम्बो तीन नग ७५ हजारांत खरेदी केले. मात्र, प्रत्यक्षात दिसत नसल्याचे सरपंचांनी सांगितले.