झेडपीत ९९ अनुकंपाधारकांना मिळाली नोकरी
By जितेंद्र दखने | Published: February 9, 2024 09:51 PM2024-02-09T21:51:16+5:302024-02-09T21:51:27+5:30
गट ‘क’ आणि ‘ड’ मध्ये पदस्थापना : समुपदेशनाने निवड प्रक्रिया
अमरावती: जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असताना आई, वडील किंवा पतीचे अनुकंपा तत्त्वावर वारसाला नोकरी दिली जाते. त्यानुसार झेडपीतील एकूण रिक्त पदाच्या २० टक्के जागावर शुक्रवारी जिल्हा परिषदेतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील विविध पदावर निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली तर सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांच्या उपस्थितीत अनुकंपा तत्त्वावरील रिक्त असलेल्या पदासाठीची भरती प्रक्रिया ९ फेब्रुवारी रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या भरती प्रक्रियेसाठी पात्र असलेल्या जिल्हाभरातील एकूण ९९ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यानुसार अनुकंपावर नियुक्तीसाठी संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दस्तऐवजांचे पडताळणीनंतर पात्र असलेल्या ९९ उमेदवारांना जिल्हा परिषदेतील विविध विभागातील रिक्त असलेल्या पदावर समुपदेशन पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये स्थापत्य अभियंता सहायक, कनिष्ठ सहायक लेखा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष, वरिष्ठ सहायक लिपीक, विस्तार अधिकारी सांख्यिकी, अंगणवाडी पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता बांधकाम, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा, परिचर आदी पदावर सामावून घेण्यात आले आहे.
या प्रक्रियेसाठी सहायक प्रशासन अधिकारी नीलेश तालन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीकांत मेश्राम, कनिष्ठ प्रशासन गजानन कोरडे, कनिष्ठ सहायक राहुल रायबोले, निशांत तायडे, सुजीत गावंडे, सतीश पवार, समक्ष चांदुरे, राजू गाडे आदींनी अनुकंपा भरतीसाठी सहकार्य केले. जिल्हा परिषदेत अनुकंपावर विविध पदावर निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश दिले जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांनी सांगितले.
अशा मिळाल्या अनुकंपावर नियुक्त्या
स्थापत्य अभियंता सहायक-०८,कनिष्ठ सहायक लेखा-०१,प्रयोग शाळा तंत्रज्ञ-१,आरोग्य सेवक पुरुष-१९,वरिष्ठ सहायक लिपिक-०२,विस्तार अधिकारी सांख्यिकी-०२,अंगणवाडी पर्यवेक्षक-०२,औषध निर्माण अधिकारी-०२,कंत्राटी ग्रामसेवक-१८,कनिष्ठ अभियंता बांधकाम-०१,कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा-०४ या प्रमाणे नियुक्त्या दिल्या आहेत.