मुंबई बाजार समितीच्या दोन संचालकपदाकरिता ९९ टक्के मतदान; २ मार्च रोजी मुंबईत मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:47 PM2020-02-29T18:47:49+5:302020-02-29T18:48:37+5:30
मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळाकरिता अमरावती विभागातील दोन संचालकपदांसाठी शनिवारी ९९ टक्के मतदान झाले.
अमरावती : मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळाकरिता अमरावती विभागातील दोन संचालकपदांसाठी शनिवारी ९९ टक्के मतदान झाले. विभागात या निवडणुकीकरिता एकूण ८०७ मतदार व सात उमेदवार रिंगणात होते. विभागातील सर्व बाजार समितींच्या संचालकांना मतदानाचा अधिकार आहे. २ मार्च रोजी मुंबईस्थित कांदा, बटाटा बाजार आवार लिलावगृह, वाशी, तुर्भे येथे मतमोजणी होणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमरावती विभागातील दोन संचालकपदाकरीता शंकरराव गजाननराव चौधरी (अकोला), माधवराव गणपतराव जाधव (बुलडाणा), भाऊराव मारोतराव ढवळे (यवतमाळ), प्रवीण विनायकराव देशमुख (यवतमाळ, पांडुरंग पुरुषोत्तम पाटील (बुलडाणा), दिलीप संभाराव बेदरे (यवतमाळ) व गोंविदराव गणपतराव मिरगे (बुलडाणा) उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीकरिता जिल्हा उपनिबंधक कार्यालय हे निवडणूक केंद्र होते.
सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदानाच्या वेळेत दुपारी ४ वाजेपर्यंत शतप्रतिशत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमरावती जिल्हा केंद्रावर जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनात कल्पना धोपे, केंद्रप्रमुख धनराज धुर्वे व सहायक म्हणून योगेश अग्रवाल, प्रतिभा भिवगडे, कल्पना चौधरी, राम देशमुख व सुधीर मानकर यांनी काम पाहिले.
असे आहे जिल्हानिहाय मतदान
या निवडणुकीकरिता विभागात एकूण ८०७ मतदार आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १७५ मतदारांपैकी १४६ पुरुष व २९ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बुलडाणा जिल्ह्यात १३३ पैकी १३२, वाशीम जिल्ह्यात ७५ पैकी ७४, अकोला जिल्ह्यात १०१ पैकी ९९ व यवतमाळ जिल्ह्यात २२० पैकी २१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.