बंद दिवा छेडला अन् विद्यार्थी प्राणास मुकला; अमरावती जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 12:44 PM2022-12-01T12:44:42+5:302022-12-01T12:45:02+5:30
पाळ्यातील १६ वर्षीय मुलाचा शॉर्टसर्किटने मृत्यू
मोर्शी (अमरावती) : नजीकच्या श्रीक्षेत्र पाळा येथील एका १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा शॉर्टसर्किटमुळे मृत्यू झाला. २० नोव्हेंबरच्या रात्री हा अपघात घडला. तो मैदानात खेळत असताना हा प्रकार घडला.
वेदांत उमेश राऊत (१६) असे मृत मुलाचे नाव आहे. तो दहा ते पंधरा मित्रांसोबत जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर रात्री ७ च्या सुमारास कबड्डीचा सराव करीत होता. त्यावेळी अचानक लोखंडी खांबावर असलेला दिवा बंद पडला. वेदांतने त्या ठिकाणी जाऊन एका काठीच्या साहाय्याने या दिव्याच्या वायरला धक्का दिला व पोल हलविला. त्यात अचानक विजेचा संचार झाल्याने वेदांत खांबाला चिकटला. काही साथीदारांनी त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी घटनेची माहिती त्याच्या आई-वडिलांना दिली.
वेदांतला तत्काळ मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. मात्र,अमरावती येथील रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी वाटेतच वेदांत या शाळकरी मुलाची प्राणज्योत मावळल्याने समाजमन सुन्न झाले. त्याच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून वेदांतचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. ३० नोव्हेंबर रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
वेदांत हा मोर्शीच्या ज्ञानदीप विद्यालयात शिकत होता. त्याने सन २०२२ च्या कबड्डी स्पर्धेमध्ये सन्मानचिन्ह प्रदान करून मोर्शी तालुक्यात नावलौकिक केले होते. त्याच्या अशा अचानक 'एक्झिट'ने समाजमन हळहळले