तरूणीला ‘आय लव्ह यू पिल्लू’ म्हणत पोलिसाने केला बलात्कार, शिवारात नेऊन बळजबरी
By प्रदीप भाकरे | Updated: March 15, 2023 19:26 IST2023-03-15T19:26:42+5:302023-03-15T19:26:59+5:30
20 वर्षीय तरूणीला ‘आय लव्ह यू पिल्लू’ म्हणत पोलिसाने तिच्यावर बलात्कार केला.

तरूणीला ‘आय लव्ह यू पिल्लू’ म्हणत पोलिसाने केला बलात्कार, शिवारात नेऊन बळजबरी
अमरावती : 'सदरक्षणाय खलनिग्रहनाय' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. त्याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. मात्र येथील एका पोलिसाने दाखल केसमध्ये सहकार्य करण्याची बतावणी करून एका आरोपी तरूणीला फुस लावली. तिचे सर्वस्व लुटले. मग काय, खाकीला देखील आपल्या पोलीस अंमलदाराविरूध्द गुन्हा दाखल करावा लागला. १५ मार्च रोजी दुपारी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. त्याने तिला आय लव यू पिल्लू असे व्हॉट्सॲप मॅसेज टाकून तिला प्रेमजाळात ओढले.
तक्रारीनुसार, नीलेश जगताप (३८) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. येथील एका २० वर्षीय तरुणीवर शहरातील एका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याच्या चाैकशीची जबबादारी नीलेशकडे होती. त्याने तरुणीला मदत करतो, असे म्हणून तिचा विश्वास संपादन केला. चौकशीदरम्यान तिला स्वत:चा मोबाइल क्रमांक देऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिच्यासोबत व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू केली. आपण भेटून बोलू, असे तो म्हणत होता. २ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याच केसबाबत बोलायचे आहे, असे म्हणून नीलेशने तरुणीला छत्री तलाव येथे बोलाविले. तेथे चर्चा झाली. पुढे १० मार्च रोजी केससंदर्भात बोलायचे आहे. आपण चिखलदरा येथे जावून बोलू, असे तरुणीला म्हटले. त्यानंतर १३ मार्च रोजी नीलेशने पीडित तरुणीला आय लव यू पिलू, उद्या चिखलदरा जावू, खूप मजा करू, रोमांस करू, असा मेसेज केला.
गुन्हयात फसविण्याची धमकी
१४ मार्च रोजी नीलेशने तिला व्हीएमव्ही परिसरात बोलाविले. दुचाकीवर तिला चांदूरबाजार मार्गावर घेऊन गेला. चांदूरबाजार येथून चक्कर मारून येऊ, असे म्हणत त्याने अचानक मार्गात तिला दुचाकी थांबवायला सांगितली. आपण शेतात जावून बोलू, असे तो तरुणीला म्हणाला. त्यानंतर नीलेशने तरुणीला एका शेतात नेले. तेथे शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास विरोध केल्यावर त्याने तिला गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली. त्यानंतर नीलेशने तरुणीचे लैंगिक शोषण केले. घटनेनंतर पीडित तरुणीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नीलेश जगतापविरुद्ध गुन्हा दाखल केला.